Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ मे, २०२३

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचा मुंबईमध्ये झंजावाती दौरा, महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारमुळे परिवर्तनाला सुरुवात



मुंबई दिनांक 17 मे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांनी मुंबईचा झंजावाती दौरा केला. महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार असताना प्रत्येक विकास कामांमध्ये आडकाठी आणण्याचे काम करण्यात येत होते, मात्र आता शिंदे -फडणवीस सरकार मुळे विकासाला गती मिळाली असून या डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्रात परिवर्तन होते आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज येथे केले.

आज दुपारी १ वाजता मुंबई विमानतळावर जे. पी. नड्डा यांचे आगमन झाले तिथे मुंबई भाजपातर्फे त्यांचे ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्र प्रभारी सिटी रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्यासह खासदार पुनम महाजन, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार पराग अळवणी आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
मुंबई दौऱ्याची सुरुवात सायन - पनवेल मार्गावर देवनार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अभिवादन करून करण्यात आली.
त्यानंतर खासदार मनोज कोटक यांच्या लोकसभा मतदारसंघात घाटकोपर - मानखुर्द लिंक रोडवर आरबीके हॉल येथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजनांची माहिती दिल्यानंतर मागिल काळात राज्यात आलेल्या आघाडी सरकारमुळे या योजना रोखण्यात आल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. तसेच आता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात डबल इंजिनचे सरकार आले असून महाराष्ट्र आता गतिमान झाला आहे आणि महाराष्ट्रात आता पुन्हा परिवर्तनाला सुरुवात झाली आहे असा विश्वास ही व्यक्त केला.
त्यानंतर त्यांनी घाटकोपर येथील माता रमाबाई नगर येथे जाऊन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. तर भाजपा पदाधिकारी संघदीप केदारे यांच्या घरी आज त्यांनी दुपारी भोजन केले त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला.
त्यानंतर बोरिवली येथील अटल स्मृती उद्यानातील अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तर येथील सभागृहात शहरातील प्रतिष्ठित नागरिक व बुध्दीवंतांशी संवाद साधला. तर चारकोप येथे पन्ना प्रमुख बैठकीत सहभागी होऊन पन्ना प्रमुखांना मार्गदर्शन केले. तसेच मालाड येथे वास्तव्यास असणाऱ्या पद्मश्री सोमा घोष यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन संवाद साधला. सोमा घोष यांनी भगवान शंकरावरील गीत सादर केले.

संध्याकाळी विलेपार्ले येथे मुंबईतील पक्षाच्या मोर्चा, आघाडी प्रमुखांशी संवाद साधला.यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, गेल्या महापालिका निवडणुकीत आपली सगळ्यांची जी इच्छा अपूर्ण राहीली ती पुर्ण करण्याची संधी आता येणाऱ्या पालिका निवडणूकीत आपल्याला मिळणार असून त्याच्यासाठी सगळ्यांंनी एकजूटीने कामाला लागू या.
तर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले की,आघाडी सरकारच्या काळात मेट्रो बुलेट ट्रेन यासारखे महत्त्वाचे प्रकल्प रखडवण्यात आले, अडवण्यात आले यांच्या वसुलीच्या अनेक कहाण्या सगळ्यांनाच माहित आहेत.त्यामुळे आता जेव्हा केव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी मुंबई महापालिकेची तिजोरी आपणाला मुंबईकरांच्या हाती द्यायची आहे. त्याची होणारी लूट थांबवायची आहे, मुंबई महापालिकेवर महापौर कोणाचा होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही, मुंबई महापालिका आता आपणाला मुंबईकरांच्या हाती द्यायचे आहे,.असे आवाहन त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जे पी नड्डा म्हणाले की आज भाजपामध्ये काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते हे अत्यंत भाग्यवान आणि नशीबवान आहेत कारण भाजपा हा आज जगातील सर्वात मोठा पक्ष आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे जगविख्यात नेतृत्व आज आपल्या पक्षाकडे आहे आज देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि 2047 पर्यंत आपला देश आपणाला एक विकसित देश म्हणून पुढे आणायचा आहे अशा अत्यंत अमृत काळामध्ये आपण सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत ज्या क्षणांची इतिहासात नोंद होईल अशा कालखंडाचे आपण साक्षीदार आहोत दुसरीकडे सर्वच पक्ष परिवार वादी आहेत ज्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे नियत नाही ज्यांच्याकडे नियत आहे त्यांच्याकडे ताकद नाही अशी देशभरातील राजकीय पक्षांची स्थिती आहे मात्र भाजप हा एकमेव पक्ष असा आहे आपल्याकडे नेता आहे नीती आहे आणि नियती आहे बाकी सर्व पक्ष परिवार वादासाठी काम करत आहेत तर भाजपा विकासवादासाठी काम करतो आहे. यानंतर त्यांनी रात्री मुंबई कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन संवाद साधला उद्या सकाळी पुन्हा ते मुंबई दौऱ्याला सुरुवात करणार असून सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणरायांचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात होणार आहे त्यानंतर ते परेल येथील यशवंत भवन येथे मुंबईतील संघ पदाधिकाऱ्यांची संवाद साधतील व प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे युवकांशी ते संवाद साधणार आहेत
दिवसभराच्या या संपूर्ण दौऱ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रभारी सि.टी रवी, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर, आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, भारती लव्हेकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार पराग आळवणी, अंबरीश पटेल, माजी आमदार प्रकाश भाई मेहता आदींसह आप आपल्याला विभागात भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध