Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ९ मे, २०२३

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ? शहादा ते शिरपुर व दोंडाईचा रस्ता:सा. बां.विभागावरचा काळा डाग !!



धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सा.बां. विभागाच्या कामकाजावर सर्वात सर्वात मोठा काळा डाग कोणता आहे ? या प्रश्नाचे उत्तर आहे शहादा - सारंगखेडा - दोंडाईचा रस्ता व शहादा - शिरपूर रस्ता हा आहे.वर्षानुवर्षे या दोन रस्त्यांचा दुरावस्थेचा विषय गाजतो आहे.या सोबतच इतर रस्त्यांचाही विषय आहे.परंतु शहादा - शिरपूर व शहादा - दोंडाईचा रस्त्यांचा विषय आता नागरिकांच्या हाता बाहेर गेला आहे.
मुळात या रस्त्यांना रस्ते म्हणावे,की अजून काही म्हणावे ? या प्रश्नाचेही उत्तर शोधण्याची वेळ आली आहे.या रस्त्यांवर वाहन चालविणे म्हणजे कसरत करणेच झाले आहे.रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ? ही स्टेप या रस्त्यांनी केव्हाच ओलांडली आहे. 

आता काही भागात कोणे एके काळी येथे रस्ता होता ! असे म्हणण्याची वेळ आली आहे.या रस्त्यावर जिवघेण्या अपघातांची मालिका होवून चुकली आहे.उसाची व अन्य मालाची कितीतरी वाहने उलटली आहेत.या रस्तांसाठी शहाद्याचे राजकीय नेते कार्यकर्ते शेतकरी यांची लागोपाठ आंदोलने झाली आहेत.बन्याचदा सा बां  अधिकार्‍यांनी थातुर - मातुर बोलून वेळ मारून नेली आहे.रडत्याचे आसु पुसावे,असे कुठे कुठे खड्डे बुजविण्याचा देखावा केला आहे.त्याचा काही उपयोग झालेला नाही.या सर्व पार्श्वभुमीवर आता पुन्हा शहाद्याचे अभिजित पाटील आदी मंडळींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

या इशार्‍यांचा सा बां अधिकार्‍यांवर काय परिणाम होणार आहे ? या आधी तर काही परिणाम झालेला नाही.आता काय होईल ? हा प्रश्न विचारला जात आहे.एकिकडे राज्यभर रस्त्यांच्या बाबतीत उलट सुलट मतप्रवाह आहेत. एकिकडे दणकुन टोल वसुल करणारे फोर लेन - एक्सप्रेस हायवे - ग्रीन फिल्ड हायवे - अपघातांची मालिका लावणारा समृद्धी महामार्ग अशी स्थिती.दुसरी कडे दहा - दहा वर्षे लटकलेला मंबई - गोवा महामार्ग.चाळीसगाव - कन्नड मधला लटकलेला औट्रम घाट.अशी कितीतरी उदाहरणे आहेत.वर्षानुवर्षे लटकलेला विषय - कोण काम करेल ? राज्याचा साबां विभाग की केंद्रिय राजमार्ग प्राधिकरणाचा राष्ट्रीय महामार्ग ? या खेचाताणीत अडकलेले महामार्ग वर्षानवर्षे  दुरुस्ती - नुतनीकरणाची वाट पाहात आहेत.त्यामुळे नागरिक परेशान आहेत.आता तर राज्य सरकार कडून रस्त्यांच्या गुणवत्ता पूर्ण वेगवान देखभाल दुरुस्ती साठी ' महाराष्ट्र राज्य पायाभुत सुविधा विकास महामंडळ ' स्थापन करण्याचा निर्णय मंत्री मंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.प्रारंभी या महामंडळाचे भाग भांडवल १०० कोटी रुपये राहणार आहे.त्यात शासनाचा ५१ टक्के हिस्सा राहणार आहे.यात रस्ते व इमारती विकास व देखभाल पूरक निधीचीही उभारणी करण्यात येईल.आज राज्यात साधारणतः ३ लाख कि.मी.रस्ते आहेत.त्यापैकी १ लाख कि.मी.प्रमुख राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. राज्यात वाहतूक वाढली आहे. 

अवजड वाहनांच्या रहदारीमुळे रस्ते खराब होतात.त्यांची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे राज्यात या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.आता  शहादा - सारंगखेडा - दोंडाईचा व शहादा - शिरपुर  या महादुरावस्था  झालेल्या रस्त्याचे काम कोण करणार आहे? केंद्रिय राजमार्ग प्राधिकरण - राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग, की नव्याने स्थापन झालेले म.रा. पायाभुत सुविधा विकास महामंडळ ? कोण करणार हे नुतनीकरण ? कोणीही करो ! धुळे - नंदुरबार जिल्ह्यातील व अन्य नागरिकांना हे काम पावसाळा लागण्याच्या आधी झालेले हवे आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध