Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २७ जून, २०२३

शिरपूर शहर शांतता कमिटीत मुस्लिम बांधवांच्या निर्णय...! पवित्र आषाढी एकादशीला कुर्बानी नाही... मुस्लिम बांधवांकडून एकतेचा अनोखा संदेश...!



शिरपूर प्रतिनिधी :- आगामी काळातील हिंदू बांधवांचा पवित्र असा मानला जाणारा आषाढी एकादशीच्या सण व मुस्लिम धर्मीयांचा बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी म्हणजे दिनांक 29 जून रोजी साजरा होत आहे.या सण उत्सवाच्या काळात शिरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व धर्मीयांची शांतता व समन्वय सभा शिरपूर शहर पोलीस ठाण्याकडून दिनांक 26 जून रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती.
शिरपूर शहर यात अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने राहत असून राज्यात आणि देशात काहीही घडो शिरपूर मात्र नेहमीच एक आगळावेगळा आदर्श निर्माण करून सामाजिक एकताच्या संदेश देत असतो.भविष्यात देखील अशीच वाटचाल सुरू राहून शांततेने संयमाने उत्साहाने सर्व समाज बांधवांनी आपापले सण उत्सव साजरा करावेत असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सर्वांसाठी पोलीस व प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य असेल अशी देखील ग्वाही देण्यात आली.

राज्यात किरकोळ कारणावरून समाजात तेढ निर्माण करण्याच्या घटना ताज्या असताना शिरपूर शहर मात्र यास पूर्णपणे अपवाद असून या शांतता कमिटीच्या बैठकीत शहरातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन एक अनोखा सामाजिक एकतेच्या संदेश दिला असून आगामी काळात येणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी शिरपूर शहरात मुस्लिम बांधवांकडून कोणत्याही प्राण्याची कुर्बानी देण्यात येणार नाही आणि हा निर्णय सर्वांमध्ये मुस्लिम बांधवांनी घेतला असल्याचे जाहीर करण्यात आले.पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या जाऊ नये या पवित्र भावनेने बांधवांनी हा निर्णय घेऊन नवीन आदर्श निर्माण केला आहे.आसा संदेश शिरपूर तालुक्यात देखील दिला जाणार असून हा उपक्रम तालुका भरात राबवण्याच्या देखील मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यामुळे मुस्लिम धर्मीयांच्या या निर्णयाचे सर्व हिंदू धर्मीय नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून असा आदर्श निर्णय घेतल्याने आभार व्यक्त केले आहेत. त्यामुळे शिरपूर शहरात पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एक्क्याचे दर्शन घडणार असून एकतेच्या व अखंडतेचा हा संदेश धुळे जिल्ह्यात व संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन शिरपूर शहर एक नवीन आदर्श निर्माण करेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला.

यावेळी उपस्थित सर्वच ज्येष्ठ नागरिक व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सर्वधर्मीयांच्या शांततेमुळेच शिरपूर शहर विकासा कडे वाटचाल करत आहे. त्यामुळे शिरपूर शहराची वाटचाल आदर्श असून शहरातील निर्णयांचे अनुकरण राज्यभरात व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी प्रशासनाने सर्व प्रकारचे सहकार्य व सेवा सुविधा देण्याचं आश्वासन दिले.

या निर्णयाचे स्वागत निमझरी येथील विठ्ठल मंदिर ट्रस्ट व बाळदे येथील मंदिर ट्रस्ट यांनी देखील केले आहे.
या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे,पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर, तहसीलदार महेंद्र माळी, नगरपरिषद सीईओ तुषार नेरकर यांच्यासह पोलिस ठाण्याचे विविध पोलीस अधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, मुस्लिम धर्मीयांचे धर्मगुरू, मुस्लिम बांधव व हिंदू बांधव यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध