Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ४ जून, २०२३

R.T.O अधिकाऱ्याची निर्लज्ज्ञपणाची झाली हद्द...!! मोटार वाहन निरीक्षक व रोखपालास पाच हजाराच्या दंडासह दोन वर्षे कैद



नंदुरबार प्रतिनिधी :-कंटेनर ट्रक चालकाकडून त्याचे वाहन गव्हाळी सीमा तपासणी पोस्टमार्गे गुजरात राज्यात जाऊ देण्यासाठी 4 हजारा रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या तत्कालीन मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक रोखपाल यांना पाच हजार रुपयांच्या दंडासहित दोन वर्ष कैदेची शिक्षा शहादा न्यायालयाने सुनावली आहे. 


दिनांक 24 फेब्रुवारी 2012 रोजी अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी  येथील सीमा तपासणी चेक नाक्यावर मोटर वाहन निरीक्षक सूर्यभान रेवजी झोडगे  व सहाय्यक रोखपाल वेलजी नहाडिया मावची (दोन्ही नेमणूक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नंदुरबार) हे कर्तव्यावर असताना, तक्रारदार कंटेनर/ट्रक चालक हे पुणे येथून त्यांच्या कंटेनरमध्ये माल भरून गुजरात राज्यात जात होते. 

ते गव्हाळी सीमा तपासणी नाक्यावर  आले असता झोडगे व मावची यांनी कंटेनर ट्रक चालकाकडून त्यांची गाडी गव्हाळी सीमा तपासणी नाक्यावरून गुजरात राज्यात जाऊ देण्यासाठी चार हजार रुपये लाच एन्ट्रीच्या स्वरूपात मागणी करुन ती पंचासमोर स्वीकारली.याबाबतच्या यशस्वी सापळा कारवाईनंतर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7,12,13 (1) (ई) (ड), 13 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान,नमूद गुन्हयाच्या तपासनीअंती शहादा येथील जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात स्पेशल केस क्रमांक 12/ 2014 अन्वये खटल्याचे कामकाज चालले.यात वरील दोन्ही सरकारी अधिकाऱ्यांवर दोषारोप सिद्ध झाल्याने न्या.सी.एस.दातीर यांनी दोघांना भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अन्वये प्रत्येकी 1 वर्ष  कैदेची शिक्षा व 5 हजार रुपये दंड, कलम 13 (ड) अन्वये प्रत्येकी 2 वर्ष कैदेची शिक्षा व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून ॲड.स्वर्णसिंह गिरासे व तपास अधिकारी म्हणून तत्कालीन पोलीस उप अधीक्षक ए.जी. वडनेरे यांनी काम पाहिले.न्यायालय समन्वय अधिकारी तथा पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उप अधीक्षक राकेश चौधरी,पोलीस निरीक्षक समाधान वाघ,पोलीस हवालदार अमोल मराठे यांनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध