Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ जुलै, २०२३

धुळे जिल्ह्यात पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा -जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल यांची माहिती...



धुळे प्रतिनिधी: दिनांक 26 जुलै, 2023 पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन त्वरीत सादर करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिनव गोयल यांनी यंत्रणेला दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज मान्सुन पुर्व कालावधीत केलेल्या पुर्व तयारीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री.गोयल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी श्री.गोयल बोलत होते.

बैठकीस जिल्हा पोलिस अधिक्षक संजय बारकुंड,मनपा आयुक्त देविदास टेकाळे,अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण,परिविक्षाधीन सनदी अधिकारी सत्यम गांधी,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार,निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण, एसआरपीएफचे सहायक समादेशक चंद्रकांत पारसकर,जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, धुळे महानगरपालिकेचे उपायुक्त विजय सनेर,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.गोयल म्हणाले की, नुकत्याच रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागाने सज्ज राहावे, ज्या विभागांनी अद्याप आपत्ती व्यवस्थापन आराखडा सादर केला नाही अशा विभागांनी त्वरीत सादर करावा. जिल्हास्तर,तालुकास्तर तसेच ग्रामपंचायतस्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा त्वरीत तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.आपत्ती व्यवस्थापन काळात सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत.आपापल्या विभागावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात.नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी.गावनिहाय आराखडे तयार करावेत.त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करावी.महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीने मान्सूनपुर्व रस्ता दुरुस्ती,गटार व नालेसफाई, विद्युत दुरुस्तीची कामे वेळेत करावी. कार्यालयप्रमुखांनी पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. संबंधित विभागांनी नियंत्रण कक्ष स्थापन करावे आणि त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.
आपत्तीच्या वेळी आवश्यक असणारे साहित्य तपासून घ्यावे.धोकादायक ठिकाणांची निश्चिती करून त्याठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत. पूरग्रस्त व दरडग्रस्त गावांसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. धरणनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात यावे.कृषी विभागाने हवामान खात्याकडून येणारा इशारा तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. उपविभागीय अधिकारी तसेच सर्व तहसिलदारांनी पुरक्षेत्रात असणाऱ्या गावांची यादी तयार करुन ठेवावी. महानगरपालिका, नगरपालिकेने धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घ्यावे यासाठी पॅनल इंजिनिअरची त्वरीत नियुक्ती करावी. पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा संदेश गावपातळीवर देण्यात यावा तसेच तहसिलदारांनी ग्रामपंचायतस्तरावर दंवडीद्वारे माहिती देण्यात यावी.

आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगाबाबत पुरेसा औषधसाठा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश प्रतिबंधक लशीसह औषधांचा पुरेसासाठा उपलब्ध करून ठेवावा. कार्यकारी अभियंता आणि तहसिलदार यांनी संयुक्तपणे लघु व मध्यम प्रकल्पाची पाहणी करून आवश्यकता असल्यास कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ दुरूस्ती करून घ्यावी. तसेच बंधाऱ्याचे दरवाजे,गेट कार्यान्वित होतात किंवा नाही याची तपासणी करावी.पाटंबधारे विभागाने धरणांच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने भूस्खलनाचे ठिकाणांची निश्चिती करून आवश्यक उपायययोजना कराव्यात.रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे व झाडाच्या फांद्यांबाबत आवश्यक कार्यवाही करावी.रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्या मुरूम टाकून भराव्यात.पाटबंधारे विभागाने दैनंदिन पाणीसाठा,विसर्ग,
पर्जन्यमान आदी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास पाठवावी. महावितरणने विद्युत वाहिन्यांचे आवश्यक कामे पूर्ण करुन पाणीपुरवठा योजना,नगरपालिकेच्या क्षेत्रातील वीज पूरवठा मान्सून काळात खंडीत न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्यात.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध