Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांसाठी 17 सप्टेंबरला क्षमता परिक्षा



धुळे प्रतिनिधी : दिनांक 15 सप्टेंबर, 2023 आदिवासी विकास विभागातंर्गत कार्यरत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धुळे यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा रविवार 17 सप्टेंबर 2023 रोजी 7 केंद्रावर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धींगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळावी व विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व्हावी व विकसित व्हावी ह्या हेतूने शिक्षकांची क्षमता परीक्षा घेण्यात येत आहे.

ही परीक्षा एससीईआरटी, एनसीईआरटी या पाठ्यपुस्कातील अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. क्षमता चाचणी करीता कला व विज्ञान शाखेचे तीन गट करण्यात आले आहेत. पहिला गट इयत्ता पहिली ते सातवी, दुसरा गट इयत्ता आठवी ते दहावी, तिसरा गट इयत्ता अकरावी ते बारावी असा आहे. क्षमता चाचणी 100 गुणांची असणार असून त्यामध्ये एकूण 50 बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. त्यापैकी 70 टक्के प्रश्न हे विषयावर आधारीत असतील तर 30 टक्के प्रश्न हे सामान्य ज्ञान, मानसिक क्षमता व चालू घडामोडीवर आधारीत असेल.

धुळे जिल्ह्यात अनुदानित आश्रमशाळा शिरपूर ता. शिरपूर, अनुदानित आश्रमशाळा वाघाडी, ता.शिरपूर, अनुदानित आश्रमशाळा रेवाडी ता.शिंदखेडा, अनुदानित आश्रमशाळा कुसुंबा ता.जि.धुळे, शासकीय आश्रमशाळा नवापाडा, ता.साक्री, शासकीय आश्रमशाळा रोहोड ता.साक्री, शासकीय आश्रमशाळा बोपखेल ता.साक्री या 7 केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.

धुळे प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या 22 शासकीय व 34 अनुदानित आश्रमशाळेतील 857 शिक्षक क्षमता चाचणी परिक्षा देणार आहे. क्षमता चाचणी परिक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात येणार असून त्यांच्या कार्यपद्धीचा इतर शिक्षकांसाठी अवलंब करण्यात येणार आहे. तसेच या परिक्षेच्या माध्यमातून शिक्षकांना अद्ययावत विषयज्ञानाबाबत प्रशिक्षणाची आवश्यकता आहे किंवा कसे हे ठरविण्यात येणार आहे. तरी धुळे प्रकल्पातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांनी क्षमता परीक्षेस उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्री.पाटील यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध