शिरपूर तालुक्यात वनविभागाच्या बाबतीत सध्या असेकाही घडत आहे, की वनविभागाचे अधिकारी नेमके नोकरी तरी कुणाची करतात हाच मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. वनांचे रक्षकच जर भक्षक होत असल्याची घटना शिरपूर तालुक्यातील सांगवी, बोराडी, वाडी येथील वनविभागाच्या बाबतीत होत असल्याचे दिसुन येत आहे. चक्क वनविभागाच्या कार्यालय परिसर वन अतिक्रमणाने पुर्णत: ग्रसित झालेले आहे. त्या बरोबरच शिरपूर तालुक्याने वन अतिक्रमणाचा कळस गाठला असून वन समृद्धीमध्ये वाढ होण्याच्या जागी नेमके उलटेचं घडत आहे. वन संवर्धनाच्या तिजोरीत भर टाकण्याऐवजी या तिजोरीला ओहोटी कशी लागेल, अशी कामे वनविभागाच्या अधिकारीच्यावतीने केले जात आहे. शेतीच्या संरक्षणासाठी कुंपण घातले जाते, परंतु हे कुंपणच शेण खात असेल तर, त्याला तरी काय म्हणावे असा प्रश्न आता वनविभागाचा कारभार पाहून जनतेला निर्माण होतो. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वन विभागाला समृद्धीकडे नेणे अपेक्षित असते, शिरपूर तालुक्यात नेमके उलटे घडत आहे.
एक म्हण आहे, 'तळे राखील तो पाणी चाखील' ही उक्ती सर्वश्रुत आहे. इतर शासकिय अधिका-यांबरोबर वनविभागाचा अधिका-यांना देखील ही उक्ती लागू पडते, पण त्याला देखील काही मर्यादा असली पाहिजे. पाणी चाखण्या ऐवजी आखा घडा गडप केला जात असेल तर, त्याला काय हापापाचा माल गपापा असेच म्हणावे. हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिरपूर तालुक्यात वन विभागाने वनातिक्रमणाचा अतिउच्च कळस गाठला असून जर का वनविभागाचे कार्यालय सुरक्षित नसेल तर मग हे अधिकारी वनविभागाच्या जंगलाचे संरक्षण तरी कसे काय करणार ? वनविभागाच्या सांगवी, बोराडी, वाडी कार्यालयाच्या परिसरात वन अतिक्रमण करून नागरिकांनी व जमिनीचे बोगस प्रमाणपत्र मिळवलेल्या घटना घडल्या आहेत. हे सर्व या वनविभागाच्या अधिका-यांना हे देखील ठाऊक असेल की, वन अतिक्रमण वगळता एकूण किती क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात शिल्लक आहे. त्यातच मध्य प्रदेश मधून येणाऱ्या नागरिकांकडून दररोज वाढत चालल्या वन अतिक्रमणाची कुठल्याच प्रकारची माहिती उपलब्ध नाही. म्हणजे ती गोळा करण्याचा प्रयत्नच हे अधिकारी करत नाहीत. तसेच वन विभागाने आपल्या जमिनी वन अतिक्रमण धारकांना मीटरने किंवा जीपीएस मशीनने न मोजून देता, दोरीच्या साह्याने अथवा स्वतःची मालमत्ता असल्यासारखे दोन एकर अमुक्याची व पाच एकर तमक्याची, जो जितके जास्त पैसे देईल त्याने तितकी त्याला जास्त जागा सांभाळावी असे वनविभागाच्या मार्फत होत आहे. तसेच शिरपूर तालुक्यातील वनसंरक्षक, वनपाल,वनक्षेत्रपाल यांच्या मालमत्तेचे चौकशी केल्यास त्यांनी नोकरी पासून ते आजतागायतच्या काळापर्यंत मिळालेल्या मालमत्तेवरून कळेल, की त्यांनी वनात जाऊन नेमके वनांचे संरक्षण केले की यांनी स्वतःचाच विकास केला. नक्की यांनी कोणते कर्तव्य पार पडले आहे ? हाच एक मोठा प्रश्न आहे. वन विभागातील कर्मचाऱ्यांना असे झाले आहे की, आग लगे बस्ती में, हम हमारी मस्ती में असा व्यवहार चालू आहे. याबाबत मुख्य वनविभाग अधिकारी लक्ष देणार का ? वनविभागाच्या कार्यालय परिसरात अतिक्रमण वाढत आहे. दिवसेंदिवस शिरपूर तालुका तसेच सातपुडा या भागात दररोज नवनवीन अतिक्रमण ही वाढत चाललेले आहेत याकडे वन विभाग जाणून-बुजून का काळा डोळा करीत आहे.
मध्य प्रदेश राज्यातून आलेल्या नागरिकांकडून हायवे लगत असलेल्या जमिनी पैश्याच्या बळावर लाटण्याचा व त्या गिळण्याचा जो घाट सुरु आहे तो थांबलाच पाहिय़े. संपूर्ण तालुका भरात वन अतिक्रमणाचा खेळ जोरात सुरू आहे व वन विभागाने वन अतिक्रमण वगळता इतर जमिनींचे किती संरक्षण केले याबाबत कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्याला कल्पना नाही तसेच वन विभागाने साक्री प्रमाणे कोणतेही वन संवर्धनाचे रोल मॉडेल उभे केले नाही खरे पाहायला गेले तर आपल्या जवळील साक्री तालुक्यात चैत्राम पवार हे वनसंवर्धनाच्याबाबतीत साक्री तालुक्याचे नाव हे भारतभर गाजवीत असताना शिरपूर तालुक्यात वन विभागाने कुठलाही आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासाठी कुठलेही जंगलाचे संरक्षण अथवा वन समृद्धी ही सांभाळून व पर्यटनास वाव दिला नाही त्यामुळे शिरपूर तालुक्यात हा प्रश्न उद्भवत आहे की वनसंवर्धनात वाढ होणार कधी ? व करणार कोण ? तसेच सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तसेच उपविभागीय अधिकारी शिरपूर यांनी देखील वन दावेदारांचा मध्य प्रदेशातील सेंधवा येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडून समन्वयाने आपल्या राज्यात दावा दाखल केलेल्या व्यक्तीचा तपशील मध्य प्रदेश शासनाकडून मागवणे गरजेचे आहे. व ज्यांची जमीन महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यात दोघेही ठिकाणी आहे अश्यांची चौकशी करणे गरजेचे आहे.पण तसे प्रत्यक्षात होतांना दिसत नाही.व स्थानिक भूमी पुत्रांना वन जमीन मिळण्यासाठी अडचणी येत आहेत मध्य प्रदेश राज्यातील नागरिक वन जमिनीचा लाभ घेत आहेत.
वन विभागामार्फत शिरपूर तालुक्यात लागवड होणारे वृक्ष हे फक्त कागदावरच दिसतात शासनामार्फत प्रत्येक वर्षी पावसाळ्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जाते त्याप्रमाणे शिरपूर तालुक्यात ही वृक्षांची लागवड केली जाते परंतु शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार वनविभागाच्या कागदपत्रात वन विभागाने वृक्ष लागवड केलेल्या नोंदी आढळतात परंतु प्रत्यक्षात किती वृक्ष जगले किती वृक्षांचे संवर्धन करण्यात वन विभाग यशस्वी झाला याबाबत कुठलीही अपडेट वन उपविभागाकडे उपलब्ध नाही तसेच जेथे वृक्षांची लागवड केली जात आहे त्या जागा आज ओसाड पडलेल्या दिसतात असे का होते असा संतप्त सवाल वनप्रेमींकडुनं व शिरपूर तालुक्यातील नागरिकांकडून वन विभागाला उपस्थित केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा