Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

चहार्डीच्या बस वाहकाची कौतुकास्पद कामगिरी...! सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या...कितीही संकटं येऊ दे पण इमानदार राहु गड्या...



काही माणसं अशी असतात की त्यांच्यामुळे त्यांच्या पदाला शोभा येत असते. खरंतर एसटी महामंडळात वाहक असणं ही एक साधारण बाब. परंतु या पदावर काम करत असताना त्याला न्याय देऊन आपल्या कर्तुत्वाने एक विशिष्ट उंची गाठणे हे काही प्रत्येकाला शक्य होत नाही काही क्वचितच कर्मचारी या ध्येयापर्यंत पोहोचतात. ही अग्निपरीक्षा नुकतीच पार करणारे चोपडा बस आगारातील वाहक आणि आमचे जिवलग मित्र दिपक खैरनार यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.चहार्डी गावात अतिशय प्रतिकूल कौटुंबिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबात जन्म घेऊन  दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर बस वाहकाची परीक्षा पास होऊन दिपक खैरनार हल्ली चोपडा बस डेपो येथे वाहक पदावर कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना चोपडा आगाराची बस पुण्याहून परत येताना चाकण येथून काही प्रवासी बसले होते.  अनावधानाने बाळासाहेब कर्डिले या प्रवाशाचे पैशांचे पाकीट गाडीत राहून गेले व त्यांच्या हे लक्षात न येता ते बाभळेश्वर येथे उतरले. काही वेळानंतर गाडी चेक करताना वाहक दिपक खैरनार यांच्या हाती सदर पाकीट लागले. त्या पाकिटात 15 हजार रुपयांची रोख कॅश तसेच महत्त्वाचे कागदपत्रे त्यांना आढळून आले. दिपक भाऊंनी क्षणाचाही विचार न करता ते पाकीट असणाऱ्या व्यक्तींचा पाकीट मधील डॉक्युमेंट वरुन शोध घेऊन लागलीच संपर्क केला व सदर व्यक्तीला शिर्डी स्थानकात बोलवून आगार प्रमुखांच्या उपस्थितीत त्यांच्या ताब्यात पूर्ण रक्कम व कागदपत्रे सुपूर्द करण्यात आले. खरंतर संस्काराच्या बाबतीत मोठमोठ्या गप्पा मारणे हे सहज सोपे आहे परंतु आपल्या हातात एवढी मोठी रक्कम पडलेली आहे आणि तिचा कोणीही वारसदार नसताना त्या व्यक्तीचा स्वतःहून शोध घेऊन त्या व्यक्तीस ती रक्कम जशीस तशी परत करणे या बाबी खरं तर त्या व्यक्तीवर झालेल्या संस्कारांची ओळख करून देतात...दिपक भाऊंच्या या प्रामाणिकपणामुळे खरंतर परिवहन महामंडळाची, कुटुंबाची ,त्यांच्या आई- वडिलांची ,परिसराची तसेच गावाची देखील मान अभिमानाने ताठ झालेली आहे. दिपक दादांना त्यांच्या या प्रामाणिकपणाचे फळ निश्चितच कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळेल यात शंकाच नाही. परंतु शासन दरबारी देखील अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची कदर करून यथोचित सन्मान होणे अपेक्षित आहे. दिपक भाऊंसारखे आदर्श व्यक्तिमत्व समाजात निर्माण होणे अपेक्षित आहे. दिपक भाऊंनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक तसेच त्यांच्या कार्यास शतशः प्रणाम...!🙏🏻🙏🏻
✍️शब्दांकन:- श्री.राहुल 22कर
चहार्डी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध