Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ मे, २०२४

शिरपूर तालुका पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक रोखत लाखों रुपयांचा मुद्देमाल केला जप्त....



शिरपूर प्रतिनिधी:-मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात वाहतूक केला जाणारा काका पान मसाला व गुटखा सांगवी पोलिसांनी जप्त केला. घटनास्थळावरून चालकाला अटक करण्यात आली. गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनरही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना सेंधव्याकडून शिरपूरकडे पान मसालायुक्त गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती.चार मे रोजी सायंकाळी सहाला त्यांनी पळासनेर गावाजवळ असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या चेक पोस्टवर संशयित वाहनाच्या चालकाला थांबण्याचा इशारा केला असता त्याने वाहनासह पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. हाडाखेड सीमा तपासणी नाक्यापासून पाठलाग केल्यानंतर सोनगीर गावाजवळ कंटेनर पकडण्यात पोलिसांना यश आले.
चालकाला ताब्यात घेऊन कंटेनर मधील मालाबाबत चौकशी केली असता त्याने पानमसालायुक्त गुटखा व इतर ट्रान्सपोर्टचा माल भरला असल्याची माहिती दिली. संशयित चालक शौकीन चांद (वय 35, रा. मेवात, हरियाणा) याला अटक करण्यात आली. कंटेनर पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यात काका ब्रँडचा पान मसाला व तंबाखू, केसी 1000 जाफरान जर्दा, प्रीमियम पानमसाला, प्रीमियम तंबाखू असा 13 लाख 15 हजार 56 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला.15 लाख रुपये किमतीच्या कंटेनरसह एकूण 28 लाख 15 हजार 56 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार,उपनिरीक्षक कृष्णा पाटील,हवालदार संतोष पाटील, योगेश मोरे, भूषण पाटील, स्वप्निल बांगर,
संजय भोई यांनी ही कारवाई केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध