Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ मे, २०२४

काँग्रेसच्या फसवणुकीला बळी न पडता आदिवासी बांधवांनी विकासनितीला साथ द्यावी; मोलगीतील भव्य प्रचार सभेत नेत्यांचे आवाहन



नंदुरबार - दिशाभूल करणारे खोटे मुद्दे सांगून भोळ्या भाबड्या आदिवासींची फसवणूक करणे हा काँग्रेसचा जुना धंदा आहे. संविधान आणि आरक्षण मुद्द्यावर दिशाभूल करण्यापेक्षा आमच्या विरोधकांनी विकासावर बोलावं. 35 वर्षे काँग्रेस सत्तेत असताना आणि आता अडीच वर्षे मंत्री असताना इथल्या आमदाराने कोणता विकास केला? ते सांगावं. पण काही केलं नसल्यामुळे ते सांगूच शकणार नाही आणि म्हणून कोणत्याही आदिवासी बांधवांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.फक्त आणि फक्त विकासाला साथ द्या;असे आवाहन महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या गावात आज पार पडलेल्या भव्य प्रचार सभेतील भाषणातून केले. 
आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित,माजी मंत्री पद्माकर वळवी, विधान परिषद सदस्य आमशा पाडवी,आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या मिरवणुकीला आणि प्रचार सभेला शिवसेनेच्या महिला संघटन प्रमुख प्रणिती पोंक्षे,भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य नागेश पाडवी,भाजपाचे तालुका अध्यक्ष मितेश वळवी, जिल्हा परिषद सदस्य प्रताप वळवी, रुपसिंग पाडवी,सिताराम पावरा आणि अन्य स्थानिक मान्यवर उपस्थित होते. 
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या अतिदुर्गम भागाने वेढलेल्या गावात आज दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी भारतीय जनता पार्टीच्या तथा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारासाठी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रातील दुर्गम गाव पाड्यातून शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित राहिले आणि सहभागी झाले.पारंपारिक आदिवासी नृत्य करीत मिरवणुकीच्या अग्रभागी चालणाऱ्या पथकांनी लक्ष वेधले. ढोल वाजवणाऱ्या पथकांनी सुद्धा या मिरवणुकीत विशेष छाप पडली.संपूर्ण मोलगी परिसर मिरवणुकीसाठी आलेल्या लोकांनी फुलून गेलेला दिसला.मिरवणुकीच्या समाप्तीनंतर झालेल्या जाहीर सभेप्रसंगी रणरणत्या उन्हातही शेकडोच्या संख्येने आदिवासी ग्रामस्थ उपस्थित राहिले. 
महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी विरोधकांवर घणाघाती टीका करताना सांगितले की, गरीब दुर्लक्षित वंचित घटकांना न्याय देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने केले जात आहे इतके वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने कधी आदिवासींना हा न्याय दिला नाही. घर गॅस पाणी रस्ते आणि गाव विकासासाठी कोट्यावधीचा निधी दिले शिवाय महिलांना शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम मागील दहा वर्षाच्या मी खासदारकीच्या माध्यमातून केले. असे असताना ज्यांचा जन्म मुंबईत झाला शिक्षण मुंबईत झाले ज्यांना इकडची भाषा येत नाही आणि समस्याही कळत नाही अशा उमेदवाराला निवडून देणार का ? यावर विचार करा मग मतदान करा; असेही डॉक्टर हिना गावित म्हणाल्या. 
तत्पूर्वी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी देखील काँग्रेसवर दणकेबाज टीका करणारे भाषण केले. काँग्रेस आदिवासींची फक्त फसवणूक करू शकते हे मी मागच्या तीस वर्षात काँग्रेसमध्ये असताना अनुभवले.राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यावर धनगरांना आरक्षण मिळवून देऊ असे नुकतेच जाहीर केले. आदिवासींच्या हक्काचे आरक्षण धनगरांना देणाऱ्या काँग्रेसला मतदान करणार का? असे पद्माकर वळवी म्हणाले.त्याचप्रमाणे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनीही आपल्या भाषणातून भाजप सेना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला व यापुढे आदिवासी बांधवांनी खोट्या प्रचाराला बळी पडू नये,असे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध