Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 समाज माध्यमांवर मीडिया कक्षाच्या माध्यमातून राहणार करडी नजर इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियावरील जाहिराती प्रमाणित करून घेणे आवश्यक



 धुळे, दिनांक 23 ऑक्टोबर, 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील  05-साक्री, 06-धुळे ग्रामीण, 07-धुळे शहर, 08-शिंदखेडा, 09-शिरपूर विधानसभा मतदार संघासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) ची स्थापना करण्यात आली आहे.जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्या माध्यमातून ही समिती मुद्रित, दृकश्राव्य व सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या पेड, फेक न्यूज, द्वेष व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट/बातम्यांवर बारीक नजर ठेवत आहे.तसेच राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांना समाज माध्यमांवर निवडणूक प्रचारासंबंधित जाहिरातींचे प्रमाणीकरण करून देण्याचे कार्य सुद्धा ही समिती करणार आहे. निवडणुकीचा काळ असल्यामुळे आदर्श आचारसहिंता लागू झालेली असून याचा कुठेही भंग होणार नाही यासाठी हा कक्ष गंभीरपणे काम करीत आहे.
 निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघासाठी राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण तसेच सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी मीडिया कक्षाची स्थापना केलेली असून सक्षम अधिकाऱ्यांसह सोबत आवश्यक तज्ञ व्यक्तींची, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 राजकीय पक्षास किंवा उमेदवारास आदर्श आचार संहितेत नमूद केल्यानुसार सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जाहिरात प्रसारित करून निवडणुकीचा प्रचार करावयाचा असल्यास त्यांनी त्या आधी मीडिया कक्षातील एमसीएमसी समितीकडून सदरच्या जाहिराती पूर्व-प्रमाणित (प्री-सर्टिफाय) करून घेणे आवश्यक आहे.जाहिराती पूर्व प्रमाणित करून घेताना जाहिरातीचा मजकूर,ऑडिओ,व्हिडीओ असल्यास तो,जाहिरात देण्याचे कारण, जाहिराती निर्माण करण्यास तसेच प्रसारित करण्यास येणारा खर्च विहित नमुन्यातील अर्जासोबत जिल्हा माहिती कार्यालयातील एमसीएमसी समितीकडे सादर करावा. या अर्जाच्या अनुषंगाने प्रमाणित झालेल्या जाहिरातीस मान्यता क्रमांक देण्यात येईल.प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातीसोबत जाहिरातीच्या मान्यता क्रमांकाचा उल्लेख करणे आवश्यक राहील.पूर्व-प्रमाणित न केलेल्या जाहिराती प्रसारित करून प्रचारासाठी वापरल्यास सर्व संबंधितांच्या विरोधात आचार संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते. 
 या कक्षाचे पेड न्यूज वर सुद्धा विशेष लक्ष असणार आहे.निवडणुकीच्या काळात प्रत्येक राजकीय हालचालींसह सायबर सेलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत सोशल मीडियाशी संबंधित सर्व प्लॅटफॉर्मवर उमेदवार, त्यांचे नातेवाईक,सोशल मीडिया इन्फ्लूएंजर तसेच पक्षांशी संबंधित खात्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.यात प्रामुख्याने समाजमाध्यमांवर (फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब,एक्स, व्हाट्सॲप, टेलिग्राम आदि) वांशिक,धार्मिक किंवा जातीविषयक पोस्टद्वारे सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्या, नागरिकात निवडणूक प्रक्रिये संदर्भात निवडणुकीत खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन संभ्रम निर्माण करणाऱ्या तसेच हिंसा, फेक मेसेज, मॉर्फ केलेले फोटो,ऑडिओ, व्हिडिओ,एसएमएस निर्माण करणे किंवा शहानिशा न करता अशा पोस्ट शेअर करणाऱ्यांवर मीडिया कक्षाची करडी नजर असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल.
व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या बंदिस्त मेसेजिंग ग्रुपचे व्यवस्थापन करणाऱ्या ॲडमिनने त्यांच्या सदस्यांद्वारे ग्रुपमध्ये दिल्या जाणाऱ्या माहिती संदर्भात सावध राहावे. ग्रुपवरील एखाद्या सदस्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यास निर्माण होणाऱ्या कायदेशीर बाबींमध्ये पोस्ट टाकणाऱ्या सदस्यांसोबत ग्रुप ॲडमिनवर देखील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
 नागरिकांना आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करावयाची असल्यास त्यांनी गुगल प्ले स्टोर वरून c-vigil ॲप डाउनलोड करून घ्यावे. या ॲपच्या माध्यमातून संबंधित तक्रारीचा फोटो/व्हीडिओ व इतर तपशील द्यावा. नागरिकांच्या तक्रारींवर निवडणूक विभागाकडून लगेच दाखल घेण्यात येईल.
 निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष यांनी समाज माध्यमांवर निवडणूक प्रचारासंबंधित जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेण्यासाठी जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती,माध्यम कक्ष,जिल्हा माहिती कार्यालय,माहिती व जनसंपर्क भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार,धुळे येथे विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेत सादर करावा. असे आवाहन मिडीया सेंटरचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी श्री. विलास बोडके यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध