Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

चोरीच्या पैश्यातून नवीन गाडी घेण्याच्या प्रयत्नात असणारा प्रवीण चोरट्याला एलसीबीने पकडले



दहिवद चोरीतील आरोपीकडून  २ लाख ९३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

अमळनेर प्रतिनिधी : चोरीच्या पैशातून नवीन गाडी खरेदी करण्याच्या प्रयत्नात असताना एलसीबी पोलिसांनी छापा टाकून तालुक्यातील दहिवद येथील पाच घरफोडीतील आरोपी प्रवीण याला पकडून त्याच्याकडून २ लाख ९३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

२६ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील दहिवद येथे भरदिवसा घरांचे कुलूप उघडून पाच घरातून सुमारे सव्वा सात लाख रुपयांची चोरी झाली होती. ग्रामीण भागात घरांच्या किल्ल्या दाराजवळ कोठेतरी लावून शेतकरी शेतात जातात. अशा घरातून चोऱ्या करण्याची  पद्धत  बिलवाडी ता जळगाव येथील प्रवीण सुभाष पाटील याची आहे. त्यामुळे एलसीबी पोलिसांना प्रविणचा संशय आला. घटना आधी आणि घटनेनंतर पोलिसांनी अमळनेर ,धरणगाव व आजू बाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक दृष्ट्या प्रवीण चा प्रवास आणि घरफोडी यातील वेळ जुळली. एलसीबी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे , हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील , प्रवीण मांडोळे , नंदलाल पाटील , भगवान पाटील , राहुल कोळी ,भागवत पाटील यांनी प्रवीण वर पाळत ठेवली. प्रवीण १ रोजी चोरीच्या पैशातून आपली जुनी गाडी विकून मानराज मोटर्स येथून नवी गाडी घेण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अमळनेरात घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्हयात चोरी केलेले १ लाख ९७ हजार रुपये रोख , ३६ हजार रुपये किमतीची अंगठी ,  गुन्ह्यात वापरलेली ६० हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण २ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
      
सहा महिन्यांपूर्वी प्रवीण याला सुमारे १८ घरफोडी प्रकरणात अटक करण्यात आली होती. अमळनेर येथील सरकारी वकील ऍड किशोर बागुल यांचीही दिवसा घरफोडी केली होती. त्याने सिल्लोड ,औरंगाबाद तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोऱ्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी चोरीच्या पैशातून लोकनियुक्त सरपंचपदाची  निवडणूक लढवली होती त्यामुळे त्याच्यावर संशय बळावल्याने तो सापडला होता. 
    
एलसीबी  पोलिसांनी मुद्देमाल आणि आरोपी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले. तपासाधिकारी भगवान शिरसाठ, अशोक कुमावत , मयूर पाटील   यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्या एस एस जोंधळे यांनी आरोपीला ५ डिसेम्बर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध