Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ जून, २०२५

धुळे जिल्ह्यात ४५० बोगस शालार्थी आयडी घोटाळा ; शिरपूर,शिंदखेडा तालुक्यातील बोगस शिक्षक भरतीची एसआय टी चौकशी व्हावी


शिरपूर/ प्रतिनिधी शिक्षण हे पवित्र क्षेत्र ओळखले जाते.परंतु या विभागातील शासकीय अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने धुळे जिल्ह्यात ४५० शालार्थ आयडी घोटाळा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.जिह्यातील शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात देखील याचे मुळ पसरले आहे.या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती करण्यात आली आहे.त्यातील काही बोगस  शिक्षक हे अनेक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत.ही शिक्षण क्षेत्रातील प्रचंड शोकांतिका आहे.राज्यात नाशिक शिक्षण विभाग सर्वात भ्रष्ट विभाग असल्याचा आरोप केला जात असून त्यात तथ्य असल्याने शासनाने शैक्षणिक हितासाठी या प्रकाराची एस.आय. टी.चौकशी करावी आणि सत्य उजेडात आणावे अशी अपेक्षा शिक्षण प्रेमींनी व्यक्त केली आहे.
   
शालार्थ आयडी घोटाळा गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत आहे.त्यात धुळे जिल्हा समाविष्ट असून याठिकाणी प्रचंड प्रमाणात घोटाळा करण्यात आला आहे.नागपूर विभागात २०० कोटी रुपयांचा घोटाळा उजेडात आला आहे.यावरून शिक्षण विभागात नेमके काय चालले आहे हे सहज लक्षात येते.
   
धुळे जिल्ह्यात तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या कार्यकाळात शालार्थ आयडी घोटाळा झाला असून त्याची संख्या ४५० एवढी आहे.जिल्ह्यात शिक्षणाचा अक्षरशः खेळखंडोबा सुरू असून हा जिल्हा भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे.शिक्षण क्षेत्र काही ठराविक अधिकारी आणि शिक्षण संस्था चालक यांनी बदनाम करून ठेवले आहे.भ्रष्ट अधिकारी प्रवीण अहिरे यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक बोगस शिक्षक भरती करण्यात आली आहे.अनेक विद्यार्थी मेहनत घेवून शिक्षणात यशस्वी झाले आहेत.त्यांना या पवित्र क्षेत्रात चांगली पिढी निर्माण करण्याची तळमळ असल्याने अशा गरजू उमेदवारांना नोकरीची संधी देण्याऐवजी लाखो रुपयांचे लालच ठेवून पात्रता नसताना अनेकांची नियुक्ती करण्यात आली आहे.या बोगस शिक्षकांपैकी काही जण शाळांचे मुख्याध्यापक आहेत.यासारखे दुर्दैव काय म्हणावे?शिक्षण क्षेत्राची अत्यंत शोचनीय अवस्था झाली आहे.
  
शिरपूर,शिंदखेडा तालुक्यात अलीकडे शिक्षण म्हणजे काय हे ठाऊक नसलेले स्वयं घोषित शिक्षण संस्था चालक निर्माण झाले आहेत.ही त्यापेक्षा देखील विचित्र परिस्थिती या पवित्र क्षेत्रात झाली आहे.या तालुक्यात अनेक ठिकाणी शाळा उघडुन ठेवल्या आहेत.पण शिक्षणाचा पत्ता नाही.
शिक्षकांना काही शिकवता येत नाही तर विद्यार्थी काय शिकणार?भावी पिढी कशी तयार करणार?असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाचे अनुदान मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने आणि प्रचंड आर्थिक कमाईचे साधन म्हणून शिक्षण संस्था निर्माण होत आहेत.बोगस शिक्षक निर्माण करण्यात तत्कालीन शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे यांचा मोठा सहभाग असल्याने शिरपूर, शिंदखेडा तालुके भ्रष्टांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.अहिरे यांनी पदावर असताना बोगस पद्धतीने परवानगी दिल्याने  अशा शाळांची चौकशी होणे गरजेचे आहे.
  
नाशिक विभागाचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी धुळे येथील जिल्हा शिक्षण विभागात येवून बोगस शाळांची कागदपत्रे एका टेम्पोने नाशिकला नेली होती.त्यांची त्याठिकाणी छाननी केली गेली.त्यात बराच मोठा घोटाळा दिसून आला.
त्यावर उपासनी यांनी शासनाला सविस्तर अहवाल सादर करण्याची गरज असताना त्यांनी धुळे जिह्यातील बोगस शाळांच्या संस्था चालकांना नाशिक येथे बोलावून त्यांच्याकडून लाखो रुपये घेत हा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दडपून टाकला असा आरोप रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रसार माध्यमांसमोर करण्यात आला आहे.या पक्षाने सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे.
        
चौकट
  
बोगस शिक्षक भरतीची कागदपत्रे ताब्यात घ्या! शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात झालेल्या बोगस शिक्षक भरतीची प्रक्रिया ज्या भ्रष्ट मार्गाने केली गेली.ती पाहता शासनाने निवृत्त न्यायाधीश यांचा समावेश असलेली एसआयटी चौकशी समिती नियुक्त करावी.सर्व प्रथम बोगस शाळा,तेथील शिक्षक भरती,मुख्याध्यापक यांची बनावट आणि बेकायदेशीर नियुक्ती याबाबत कागदपत्रे गोळा करून या बोगस शाळांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन समितीने चौकशी केली तर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.बोगस संस्था चालक यांना बेड्या ठोकल्या गेल्या पाहिजेत अशी शिक्षण प्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध