Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ जुलै, २०२५

शिरपूर पिपल्स को.ऑप.बँकेत १.६६ कोटींचा घोटाळा उघड; कनिष्ठ अधिकारी योगेश गुजर गजाआड



शिरपूर : शिरपूर पिपल्स को. ऑप. बँकेत १ कोटी ६६ लाख ५८ हजार ८५१ रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेचा कनिष्ठ अधिकारी योगेश पुना गुजर रा खर्द पवन नगर याने स्वतःच्या आणि पत्नीच्या बँक खात्यावर गैरव्यवहार करून ही रक्कम वर्ग केली असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र रघुनाथ माळी, व्यवस्थापक, शिरपूर पिपल्स को. ऑप. बँक लि., शिरपूर, यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. बँकेला आरटीजीएस सुविधा देण्यासाठी स्वतःचा आयएफएससी कोड नसल्यामुळे, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, जळगाव येथे बँकेचे चालू खाते आहे. या खात्यात साधारणतः ७ ते ८ कोटी रुपये शिल्लक ठेवले जातात.
बँकेतील बँक खाते शिल्लक जुळवणीचे काम कनिष्ठ अधिकारी योगेश पुना गुजर यांच्याकडे सोपवण्यात आले होते. २६ जून २०२५ रोजी योगेश गुजरने लिपिक राहुल रसिकलाल गुजराथी यांच्या लॉगिन व पासवर्डचा वापर करून स्वतःची पत्नी सीमा योगेश गुजर यांच्या खात्यावर १,७५,००० रुपये शिरपूर पिपल्स को. ऑप. बँकेच्या होम अकाउंटमधून वर्ग केले. विशेष म्हणजे, त्याने स्वतःच्या लॉगिन व पासवर्डचा वापर करून ही एंट्री बरोबर असल्याची खात्री केली.

ही बाब लिपिक राहुल गुजराती यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरटीजीएस अधिकारी विजय दत्तु पाटील यांना माहिती दिली. विजय पाटील यांनी कोटक महिंद्रा बँकेचे आरटीजीएस खाते तपासले असता, सदर रक्कम कोटक महिंद्रा बँकेत जमा झाली नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शाखा व्यवस्थापक योगेंद्र राजेंद्रसिंग पाटील यांना कळवले. २८ जून २०२५ रोजी बँक व्यवस्थापनाने याची दखल घेतली.

तपासाअंती असे निष्पन्न झाले की, योगेश पुना गुजर याने ४ मार्च २०२० ते २६ जून २०२५ या कालावधीत पत्नी सीमा योगेश गुजर यांच्या बँक खाते क्रमांकावरून एकूण १,६०,४३,७००/- रुपये (एक कोटी साठ लाख त्रेचाळीस हजार सातशे रुपये) वर्ग केले. तसेच, स्वतःच्या बँक खाते क्रमांकावर १५ जून २०२१ ते २१ फेब्रुवारी २०२५ या काळात ६,१५,१५१/- रुपये (सहा लाख पंधरा हजार एकशे एकावन्न रुपये) वर्ग केले. अशाप्रकारे, एकूण १,६६,५८,८५१/- रुपये (एक कोटी सहासष्ठ लाख अठ्ठावन्न हजार आठशे एकावन्न रुपये) चा अपहार केला आहे.

योगेश पुना गुजरने बँकेतील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड  वापरून स्वतःच्या व पत्नीच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग केली आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बँकेची फसवणूक केली.

शिरपूर शहर पोलिसांनी याप्रकरणी  गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक संदीप दारवडे हे पुढील तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध