Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ जुलै, २०२५

शालार्थ आयडी घोटाळ्याला चाप राज्यव्यापी चौकशीसाठी SIT गठीत, शिक्षणमंत्र्यांची घोषणा !!


मुंबई: महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत दिली. या महाघोटाळ्याची चौकशी आता विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) केली जाणार असून, यामध्ये वरिष्ठ आयएएस, आयपीएस तसेच कायदेशीर जाणकार अधिकाऱ्यांचा समावेश असेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. येत्या तीन महिन्यांत ही चौकशी पूर्ण होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडत, एकट्या नागपूर विभागातच १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला. २०१२ पासून अनेक अपात्र शिक्षकांनी कोट्यवधी रुपये पगारापोटी लाटले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. "राज्याचा आकडा फार मोठा आहे," असे म्हणत त्यांनी या घोटाळ्याची भीषणता अधोरेखित केली.

'तुमच्या नाकाखालीच घोटाळे' - विरोधकांचा सरकारवर निशाणा

मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी शिक्षणमंत्री भुसे यांच्याच नाशिक जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळे झाल्याचा आरोप करत सरकारला धारेवर धरले."तुमच्या नाकाखालीच घोटाळे होत आहेत. काही अधिकारी वर्षानुवर्षे जिल्ह्यातच ठाण मांडून आहेत," असे म्हणत त्यांनी प्रशासकीय निष्क्रियतेवर बोट ठेवले. मंत्री भुसे यांनी या आरोपांची चौकशी सुरू असून, सरकारला फसवणाऱ्यांकडून वसुली केली जाईल, असे स्पष्ट केले.

१९ जणांवर गुन्हे दाखल, कुणाचीही गय नाही!

भाजपचे प्रशांत बंब यांनीही या घोटाळ्याची एसआयटी चौकशीची मागणी केली होती.या घोटाळ्यात आतापर्यंत १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत."घोटाळ्यात सामील असलेले शिक्षण संस्थाचालक, अधिकारी, शिक्षक कोणालाही सोडले जाणार नाही, सरकारचा पैसा लाटणाऱ्यांकडून तो वसूल केला जाईल," अशी ग्वाही मंत्री भुसे यांनी दिली.

शिंदेसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा जिल्ह्यात झालेल्या या घोटाळ्याकडे लक्ष वेधत सरकार घोटाळेबाज अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे का, असा सवाल केला. काशिनाथ दाते यांनीही आरोपींकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्याची मागणी केली.

एकंदरीत, शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती आणि त्याचे गंभीर परिणाम पाहता, एसआयटी चौकशीची घोषणा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ही चौकशी किती प्रभावी ठरते आणि दोषींवर कधी कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध