Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ जुलै, २०२५

आषाढी एकादशी निमित्त बेटावद येथे विठुरायाची पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न...!



बेटावद प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे आषाढी एकादशीच्या शुभदिनी बेटावद येथील माळी वाडा परिसरातील विठ्ठल मंदिरात पारंपरिक भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात विठ्ठल-रुक्मिणी पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

सकाळी पहाटे काकड आरतीने एकादशीची सुरुवात झाली. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीची पूजा, अभिषेक, भजन-कीर्तन आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

पालखी मिरवणुकीची सुरुवात विठ्ठल मंदिरापासून करण्यात आली. मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालय, बाजारपेठ, आंबेडकर चौक, वाणी गल्ली मार्गे परत विठ्ठल मंदिर येथे परतली. या मार्गावर ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले.

या पालखी सोहळ्यात माळी वाड्यातील माता-भगिनींसह लहानथोर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदंगांचा गजर, हरिपाठ आणि भक्तिरसपूर्ण गजरांनी परिसर दुमदुमून गेला होता.

मिरवणुकीदरम्यान भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांच्या सहभागामुळे संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध व भव्यतेने पार पडला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध