Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

सेंट्रल बँक विखरण शाखा मार्फत वरुळ येथे आर्थिक समावेशन मोहीम



त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडिया, विखरण शाखेच्या वतीने वरुळ ग्रामपंचायतीत भव्य शिबिराचे आयोजन दि.२१ ऑगस्ट वार गुरुवार रोजी करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना यांचे फायदे पोहोचवणे तसेच प्रधानमंत्री जनधन खात्यांचे केवायसी पूर्ण करणे हा आहे.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबईचे महाव्यवस्थापक श्री. जतिन रावल, सेंट्रल बँक नाशिक प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती सुमिता शंकर, महाराष्ट्र ग्रामीण बँक प्रादेशिक व्यवस्थापक गणेश कुलकर्णी, लीड बँक मॅनेजर रूपेश शर्मा, आरबीआयचे एलडीओ विजय कोडले, कार्यक्रम संयोजक व सेंट्रल बँक विखरण शाखा व्यवस्थापक श्री. पुष्पराज सिंह रघुवंशी सहाय्यक प्रबंधक आशिक मानकर तसेच ग्रामीण बँक चे बीएम दर्शनसर महाराष्ट्र ग्रामीण बँक बीएम जमीर शेख  तसेच ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र मराठे कृषिभूषण सुदाम करंके किरण अहिरे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व दीपप्रज्वलन सोहळ्याने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आर्थिक समावेशन मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. महाव्यवस्थापक श्री. रावल यांनी आपल्या भाषणात भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हीच या मोहिमेची खरी गरज असल्याचे सांगितले.

यावेळी शाखा व्यवस्थापक श्री. रघुवंशी यांनी योजनांची सविस्तर माहिती देत सांगितले की –

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत फक्त २० रुपयांत २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा उपलब्ध होतो.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत ४३६ रुपयांत २ लाख रुपयांपर्यंत जीवन विमा दिला जातो.

तर अटल पेन्शन योजनेत नागरिकांना दरमहा ५००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.

कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणात डॉ. दयानेश्वर सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

या यशस्वी उपक्रमाबद्दल लीड बँक मॅनेजर श्री. रूपेश शर्मा यांनी सर्व उपस्थित मान्यवर, अधिकारी, ग्रामस्थ, सरपंच, डॉक्टर व बँक कुटुंबाचे मनःपूर्वक आभार मानले.

संपूर्ण कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. शेवटी नागरिकांना प्रधानमंत्री जनधन योजना, विमा व पेन्शन योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे व कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचे आवाहन करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध