Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

बेटावद येथे मिरची पिकावर अज्ञात व्यक्तीकडून तणनाशक फवारणी शेतकरी मनोज माळी यांचे मोठे नुकसान



बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू माळी यांच्या शेतात लावलेले सुमारे दोन एकरांवरील दीड महिन्याचे मिरचीचे उभे पीक अज्ञात इसमाने तणनाशकाची फवारणी करून पूर्णपणे जाळले.

या कृत्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, मेहनतीने उभे केलेले पीक काही तासांत उद्ध्वस्त झाले. दीड महिन्यापासून मनोज माळी यांनी मिरची पिकाची मशागत, सिंचन व देखभाल करून पीक जोपासले होते. परंतु, अज्ञात व्यक्तीच्या दुर्दैवी व बेकायदेशीर कृतीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने शेतात जमले. सर्वांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. शेतकरी मनोज  दोधू माळी यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्याची मागणी केली असून, संबंधित दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांवर अशी विध्वंसक कृत्ये होत राहिल्यास शेती करणे धोकादायक ठरेल, असे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने भरपाई द्यावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध