Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा

ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई 

अमळनेर-तालुक्यातील ब्राह्मणे गावातील सतर्क पोलिस पाटील गणेश भामरे यांनी शुक्रवारी स्वातंत्र्य दिनानिमित्ताचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या कर्तव्यदक्षतेचे व सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले. 
      पांझरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना सोबत घेत महसूल व पोलिस विभागाच्या सहाय्याने धाडसी कारवाई करत अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून अमळनेर तहसील कार्यालयात जमा केले. या कारवाईपूर्वी पोलिस पाटील यांनी प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा तसेच सपोनि जीभाऊ पाटील यांना त्वरित कळवून बाम्हणे फाटा बैठे पथक व ग्रामस्थांसह ट्रॅप लावला. त्यानंतर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडवून वेढा घालण्यात आला. यावेळी ट्रॅक्टर मालकाने मारहाण झाल्याचा खोटा कांगावा करण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांनी तो हाणून पाडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
     तत्काळ पोलिस पाटील यांनी सपोनि जीभाऊ पाटील यांना संपर्क साधत पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. काही वेळातच पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार, संजय पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, संजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर महसूल विभागातील मंडळ अधिकारी पी.एस. पाटील, ग्राम महसूल अधिकारी भूषण पाटील, संदीप माळी, जितेंद्र पाटील, आर.के. पाटील, कल्पेश कुँवर, प्रदीप भदाणे, भूपेश पाटील यांनी घटनास्थळी येत कारवाई पूर्ण केली. ट्रॅक्टर वाळूसह महसूल विभागाच्या ताब्यात घेऊन पोलिस बंदोबस्तासह अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. या धाडसी व कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल पोलिस पाटील गणेश भामरे यांच्यासह त्यांच्या टीममधील पोलिस पाटील भाऊसाहेब पाटील (सबगव्हाण), प्रदीप चव्हाण (शिरसाळे खु.), महेंद्र पाटील (ढेकूचारम), दीपक पाटील (ढेकूसिम), कपिल पाटील (भरवस), विकेश भोई (ग्राम महसूल अधिकारी बाम्हणे), सागर पाटील (ग्राम महसूल सेवक बाम्हणे) व सतर्क ग्रामस्थ मंडळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महसूल व पोलिस प्रशासन यांच्या आदेशाने स्थापन झालेले पोलिस पाटील, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल सेवक यांच्या संयुक्त बैठे पथक मुळे तालुक्यात व परिसरात अवैध वाळू वाहतूक थांबवण्यात मोठे यश प्राप्त झाले. स्वातंत्र्यदिनी केलेल्या यशस्वी कारवाईमुळे महसूल व पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमता बरोबरच ग्रामस्तरावर कार्यरत पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या सजगतेचे उत्तम उदाहरण आज घालून दिले आहे.

गणेश भामरे 
पोलिस पाटील (बाम्हणे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध