Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून आर्थिक लूट !! झोनच्या घोळात वाहनधारक त्रस्त



शिरपूर/ प्रतिनिधी :- राज्य सरकारने वाहन धारकांना यापुढे एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी सक्ती केली आहे.त्याबाबत शासकीय आदेश काढला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे.धुळे जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी झोनचा घोळ घातला असल्याने वाहन धारकांची आर्थिक लूट चालवली आहे.एका नंबर प्लेटसाठी सुमारे दोन ते चार हजार रुपये खर्च करावे लागत असल्याने वाहन धारकांची मोठी अडचण झाली आहे.तालुका किंवा जिल्हा पातळीवर नंबर प्लेट बसविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
   
राज्य सरकारच्या २० मार्च २०२५ रोजीच्यां निर्णयानुसार अधिसूचना काढण्यात आली आहे. सदर नंबर प्लेट बसविल्या शिवाय कोणत्याही वाहनाचा बोजा कमी करणे अथवा वाढवणे,पत्ता बदल, हस्तांतरण,
फिटनेस वगैरे कामे करू नये असे आदेशात म्हटले आहे.रोज मेरटा सेप्टी सिस्टम लि.,रेल मेझान इंडिया लि., एफ टीएएच एसआरपी सोल्युएशन प्रा.लि. या तीन कंपन्यांना नंबर प्लेट बसविण्याची टेंडर देण्यात आली असून त्यांनी राज्यात तीन झोन निर्माण केले आहेत.तसेच आपसात परस्पर जिल्ह्यांची वाटणी करून घेतली आहे.

त्यामुळे वाहन धारकांची खरी अडचण झालेली आहे.कारण त्यांना या नंबर प्लेट साठी एका झोन मधून दुसऱ्या झोनमध्ये  (जिल्हा बदल) गेल्यास नंबर प्लेट लावता येत नाही.केवळ प्लेट घेण्यासाठी दोन ते चार हजार रुपये खर्च करावे लागतात. झोन मधील अंतर शंभर ते पाचशे किलो मीटर असल्याने वेळ,पैसा,इंधन यांचा मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.कारागीर प्लेट लावण्याचा अनेक ठिकाणी वेगळा वेगळा खर्च आकारात असल्याच्या तक्रारी आहेत.प्रादेशिक परिवहन विभागाकडून होणारी ही एक प्रकारची आर्थिक पिळवणूक असल्याच्या प्रतिक्रिया वाहन धारकांनी व्यक्त करून या विभागातील अधिकाऱ्यांनी चालविलेल्या मनमानी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.शासनाचे नियम पालन करण्याची तयारी असताना अधिकारी त्यात मुद्दाम खोडा घालत आहेत.वाहन धारकांची आर्थिक लूट,सहन करावी लागणारी गैरसोय होत असली तरी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची मात्र चांदी होत आहे.
वेगवेगळे झोन निर्माण करून प्लेट साठी दर वेगवेगळे घेतले जात असल्याने त्यात मोठी फसवणूक ग्राहकांची केली जात असल्याची तक्रार आहे.
  
वाहन धारकांना नंबर प्लेट घेण्यासाठी व ती बसविण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही होणे गरजेचे आहे.त्यासाठी परिवहन विभागाने सर्व तीन झोन एकत्रित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.तसेच वाहनाच्या कंपनी नुसार राज्यात कोणत्याही जिल्ह्यात नंबर प्लेट बसविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे.जेणे करून वाहन धारकांची आर्थिक फसगत होणार नाही आणि त्यांची एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याची,
त्यासाठी प्रचंड पैसा,इंधन खर्च करण्याची परवड थांबेल.त्याचबरोबर कोणत्याही परिवहन कार्यालयाने नंबर प्लेट साठी अडवणूक करू नये अशी मागणी वाहन धारकांनी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध