Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

वाघोदे परिसरातील औद्योगिक प्रकल्पांमुळे आरोग्य धोक्यात..!



शिंदखेडा प्रतिनिधी/ नरडाणा औद्योगिक क्षेत्रातील वाघोदे गावाजवळ सुरु असलेल्या जिंदाल पावर लिमिटेड (कोळसा आधारित वीज निर्मिती) व अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड (कोळसा राखेपासून सिमेंट निर्मिती) या प्रकल्पांमुळे परिसरातील वातावरण प्रदूषित झाले असून ग्रामस्थांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, या प्रकल्पांमधून निघणारे दूषित सांडपाणी व हवेत उडणारे फाइन ॲश व फ्लाय ॲशमुळे विहिरीचे पाणी विषारी झाले आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवर तर होतोच, पण नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांचे विकार, त्वचेच्या समस्या, हृदयरोग व कर्करोग यांसारख्या गंभीर व्याधींना सामोरे जावे लागत आहे.

गावातील साधारण ७५ टक्के नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. अनेक वेळा ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

विजय युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन सादर केले. या प्रकल्पांवर वायू व जल प्रदूषण कायद्यानुसार त्वरित कारवाई करून कंपनी प्रशासनावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, योग्य उपाययोजना न झाल्यास भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यास शासन व कंपनी प्रशासन जबाबदार राहील.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध