Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ सप्टेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
पिंपरी येथील रस्त्यांची दयनीय अवस्था; रस्त्यावर हातभर खड्ड्याने नागरिक व शेतकरी संतप्त..!
पिंपरी येथील रस्त्यांची दयनीय अवस्था; रस्त्यावर हातभर खड्ड्याने नागरिक व शेतकरी संतप्त..!
शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तर पिंपरी गावात येणारे चहू बाजूंच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. शिरपुर टोल नाका वाचवण्यासाठी महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावात जाणाऱ्या रस्त्यांचा बायपास म्हणून उपयोग करण्यात येतो. रोज चोवीस तास शेकडो अवजड वाहनांचा वापर असल्यामुळे सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रस्ता तग धरत नाही. तर गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावर डांबरचा अंश देखील शिल्लक राहिला नाही.त्यामुळे गावकरी व शेतकरी यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
रस्त्यावर हातभर खड्डे असुन सुमारे सात ते आठ फुटांचे खड्डे होवुन मोठ्या प्रमाणावर त्यात पाणी साचले आहे. यामुळे वाहण चालकांना खड्यांचा अंदाज येत नाही. म्हणून अनेक वाहणे खड्यात रुततात तर बाकी पलटी घेतात. रोज लहान मोठे अपघात होतात. त्यात वाहणाचे टायर फुटणे, छोट्या कारचे चेंबर फुटणे या गोष्टी नित्यांच्या झाल्या आहेत. अनेक वाहणे घसरून थेट शेतात उतरतात कारण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल माती झाली आहे. आणि रुतलेल्या वाहनाला काढण्यासाठी वाहनचालकांना क्रेन ऑपरेटर यांना दहा ते बारा हजार रुपये देऊन आपली वाहने काढावी लागतात. यात कृषी मालाची ने-आण करणारी वाहणे देखील आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी बेजार झाला असुन हा खर्च त्यांना परवडणारा नाही.हा रस्ता वाहनधारकांसाठी टोल चुकवण्याचे साधन असले तरी गावातील शेतकरी बांधवांचा कृषी मालाच्या दळणवळणासाठी मुख्य रस्ता आहे.
दिवसभरात महामार्गावरील तसेच बाभळे येथील स्टोन क्रशर वरुन चालणारे शे- दीडशेहून अधिक अवजड वाहने, टिप्पर तर गौण खनिजांची वाहतूक करणारे शेकडो डंपर चालतात. यांच्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
महामार्ग क्रमांक ३ ते पिंपरी गावात जाणारा हा रस्ता शेतकरी बांधवांना शहराशी जोडणारा मुख्य रस्ता आहे. कृषी मालाची वाहतूक याच रस्त्याने केली जाते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून केळी, ऊस, पपई, कापुस अशा मुख्य पिकांना बाजारपेठेत नेण्यासाठी मोठी समस्या उत्पन्न होत आहे. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे व्यापारी आपले वाहन घेऊन शेतापर्यंत येत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना वैयक्तिक खर्च करून आपले पीक ट्रॅक्टर वरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर पोहोच करत व्यापाऱ्याच्या वाहनात माल भरावा लागतो. त्यामुळे आधीच कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्याला तिप्पट मजुरी देऊन पडलेल्या भावात आपला माल विकावा लागत आहे. केवळ रस्त्यामुळे पिकाला भाव मिळत नाही तर बेभरोशाच्या उधारीवर व्यापाऱ्याला विनवणी करून माल विकावा लागत आहे.
ऊस पिक शेतातून नेण्यासाठी आव्हान
ऑक्टोंबर- नोव्हेंबर महिन्यात ऊसतोड चालू होते.पिपरी शिवारात देखील मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली आहे. मागच्या वर्षी ऊसतोड मजुरांना आपल्या वाहनातून कारखान्यात ऊस नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. आपला माल वेळेत कारखान्यात पोहोचावा यासाठी शेतकरी बांधवांकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना रोख सातशे-आठशे रुपये बक्षीस रक्कम तर त्यांची मोठ्या प्रमाणावर ओली सुकी पार्टी देवुन बडदास्त ठेवावी लागली होती. पण यावर्षी रस्त्याची परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने पिंपरी शिवारात मुकादमांनी ऊसतोड करण्यास नकार दिला आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे आपले पीक कारखान्यापर्यंत पोहोचेल की नाही या विषयावर शेतकरी चिंतित आहेत. कारण हक्काचा शिसाका बंद असल्याने तालुक्यातील शेतकरी परावलंबी झाला आहे. त्यामुळे मुकादम व खाजगी कारखानदार यांची दाढी धरण्याशिवाय बळीराजा पुढे पर्याय शिल्लक राहिला नाही. आणि हीच समस्या इतर नगदी व फळ पिकांची आहे. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अतिवृष्टीमुळे शेतातील खरीप पिके जळून खाक झाली आहेत तर वरून रस्त्याची समस्या डोईजड ठरत आहे.
लोकप्रतिनिधींपुढे निधीची अडचण?
पिंपरी येथील रस्त्याच्या समस्येवर गावातील शिष्टमंडळाने धुळे नंदुरबार विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल तसेच शिरपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार काशीराम पावरा यांची वेळोवेळी भेट घेतली. आणि पिंपरी गावात येणाऱ्या चहू बाजूंच्या रस्त्यांची समस्या त्यांच्यासमोर मांडली. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावापर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरण करून ही समस्या कायमची सोडवावी अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.मात्र रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने काम करता येत नाही तर डिसेंबर अखेरपर्यंत निधी मिळाल्यास रस्त्याचे काम करण्यात येईल असे उत्तर मिळाल्याचे शिष्टमंडळातील पदाधिकारी गावकरी यांना सांगतात शिवाय रस्त्याच्या समस्येवर तशीच चर्चा गावात चालते. मात्र ऑक्टोंबर- नोव्हेंबर मध्ये ऊस पिक शेतातून बाहेर काढण्यासाठी रस्ता आवश्यक असल्याने पुढच्या महिन्यात रस्त्याचे काम होणे आवश्यक असून किमान त्यावर डागडुगी किंवा तात्पुरते खडीकरण किंवा मुरूम टाकले तरच शेतातून कृषीमाल बाजारपेठेत नेता येईल असे शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे. तर भरघोस मतांचे दान, एक हाती सत्ता देवुन देखील तीन वर्षांपासून गावातील रस्त्यांची समस्या सुटत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया गावकरी यांच्या वतीने गावातील स्थानिक पुढारी यांच्याकडे व्यक्त केल्या जात आहेत. तर गावातील पदाधिकारी यांना जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यापेक्षा वैयक्तिक हितसंबंध जपणे आणि स्वहित साधुन घेणे अधिक महत्वाचे झाल्याचे आरोप संतप्त गावकरी यांच्यावतीने केले जात आहेत.मात्र सरकार पुढे शहाणपणा चालत नाही हीच भावना गावातील पुढार्यांची दिसुन येत आहे.
तर गावातील पदाधिकारी आपल्या समस्या सोडवण्यासाठी कुठेतरी कमी पडत असल्याची जनभावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. गावकऱ्यांची व शेतकऱ्यांची मागणी आहे की, पिंपरी गावातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर वाहतूक मिळू शकेल आणि शेतकऱ्यांचा माल वेळेत बाजारात पोहोचेल.
वारंवार ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. गावकऱ्यांनी इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर ते तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील.
कॅप्शन : पिंपरी तालुका शिरपूर येथील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था..
धन्यवाद....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा