Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

१६ वर्षीय मुलीशी विवाह करून गर्भवती राहिल्याने पती विरूध्द गुन्हा दाखल


अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी विवाह करून ती पाच महिन्याची गर्भवती राहिल्याने अमळनेर तालुक्यातील भिलाली येथील तिच्या पती विरुद्ध आशा वर्करच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ येथील आशा वर्कर नलिनी कैलास गवळी ही गरोदर मातांची नोंदणी करीत असताना भवानी नगरमध्ये एका इसमाने सांगितले की माझी मुलगी पाच महिन्यांची गरोदर आहे. तिची नोंदणी करून घ्या. आशा वर्करने तिच्यासह गरोदर महिलांना सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथे सर्वोपचार केंद्रात नेले. तिला डॉक्टरांनी तपासले असता ती १६ वर्षाची असल्याचे सांगितले. त्या मुलीला विचारपूस केली असता तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न एक वर्षांपूर्वी भिलाली (ता. अमळनेर) येथील समाधान कैलास सोनवणे याच्याशी करून देण्यात आला होता. त्याच्याशी शारीरिक संबंध झाल्याने ती गर्भवती झाल्याचे सांगितले. आशा वर्करने मुलीच्या आई वडिलांना घेऊन मोहाडी पोलीस स्टेशन धुळे येथे पोक्सो कायदा कलम ४ , ८ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (१) ,६४ (२)(एल) प्रमाणे समाधान सोनवणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शून्य नंबर ने तो अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध