Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

कोल्ड्रिफ कफ सिरप ( बॅच नं एस आर-13 ) मध्ये विषारी घटक; वापर थांबविण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन...*


*मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन सतर्क* 


जळगांव प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे

 मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरप (Coldrif Syrup) या कफ औषधाच्या सेवनामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या औषधामध्ये डायइथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol – DEG) हा विषारी रासायनिक घटक मिसळलेला असल्याचे प्रयोगशाळा तपासणीत स्पष्ट झाले असून, त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाने जनतेला सावधतेचा इशारा दिला आहे.

‘कोल्ड्रिफ सिरप’ या औषधाची बॅच क्रमांक SR-13, निर्मिती दिनांक मे २०२५ आणि कालबाह्यता दिनांक एप्रिल २०२७ अशी असून हे औषध  मे. स्त्रेसन फार्मा, कांचीपुरम तामिळनाडू (Sresan Pharma, Sunguvarchathiram, Kancheepuram District, Tamil Nadu)) या कंपनीद्वारे उत्पादित करण्यात आले आहे. या औषधामध्ये आढळलेला डायइथिलीन ग्लायकोल हा घटक अत्यंत विषारी असून, त्याचे सेवन मानवी शरीरासाठी प्राणघातक ठरू शकते.

या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी नागरिकांना तातडीचे आवाहन केले आहे की, कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) हे औषध वापरणे त्वरित थांबवावे. जर हे औषध कोणाकडे उपलब्ध असेल, तर ते जवळच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयास त्वरित कळवावे अथवा त्याबाबत माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५, ई-मेल ichg.fda-mah@nic.in किंवा मोबाईल क्रमांक ९८९२८३२२८९ वर संपर्क साधावा, असे विभागाने कळविले आहे. 

राज्यातील औषध विक्रेते, वितरक आणि रुग्णालयांकडे या बॅचचा साठा आढळल्यास त्याचे वितरण तात्काळ थांबवून संपूर्ण साठा गोठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून या औषधाच्या वितरणाची माहिती घेत आहेत.

अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य याबाबत सर्व आवश्यक उपाययोजना करिता आहे. जनतेने सावधानता बाळगावी आणि धोका टाळावा असे  आवाहन  प्रशासनामार्फत प्रसिद्घीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध