Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५

बेटावद : लहान बालाजी रथोत्सव मिरवणूक उत्साहात पार, 328 वर्षांची अखंडित परंपरा कायम



धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावाची शान असलेल्या लहान बालाजी संस्थानाचा ऐतिहासिक रथोत्सव यंदाही भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. तब्बल ३२८ वर्षांची अखंडित परंपरा जपणाऱ्या या रथोत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला.

रथोत्सवाची सुरुवात दुपारी २:५० वाजता झाली. या वेळी खा. डॉ. शोभा बच्छाव, मा. आमदार रामकृष्ण पाटील, श्यामकांत सनेर आणि डॉ. दरबारसिंग गिरासे यांच्या हस्ते सामूहिक पूजन करून रथोत्सवाला विधिवत प्रारंभ करण्यात आला. पूजनानंतर महाआरती संपन्न झाली आणि त्यानंतर भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दोर ओढून रथ पुढे नेला. महिलांनी घराघरात आरती करून केळीचा प्रसाद वाटून भक्तिभाव व्यक्त केला.

या प्रसंगी खा. डॉ. शोभा ताई बच्छाव, मा. आमदार रामकृष्ण पाटील, श्यामकांत सनेर, डॉ. दरबारसिंग गिरासे, प्रफुल सिसोदे, राजेंद्र देवरे, प्रकाश पाटील, तसेच व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष प्रदीप दीक्षित, भूषण पवार, जितेंद्र सूर्यवंशी, महेश गुजराती, हरिष माळी, आसिफ पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

लहान बालाजी संस्थानाचे अध्यक्ष महावीर जैन, उपाध्यक्ष वसंत माळी, सचिव अरुण माळी, खजिनदार नंदकिशोर मेटकर, विश्वस्त सुनील देशमुख, श्रीकांत मेटकर, बापू बागुल, तसेच सदाशिव माळी, सुजित पवार, ग्रामपंचायत सरपंच मंगलचंद जैन, ग्रामसेवक प्रमोद खलाणे, योगेश राव, पावबा मिस्तरी, व व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे सदस्य   यांची उपस्थिती होती


रथोत्सवा निमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप उद्योगपती इस्माईल बागवान यांच्या तर्फे करण्यात आले. या उपक्रमामुळे हिंदू-मुस्लिम एकतेचे सुंदर दर्शन घडले.


या निमित्त बेटावद गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गावात हॉटेल, जनरल स्टोअर्स, पाळणे, रसवंती, खेळणी आणि इतर दुकाने उभारण्यात आली होती. त्यामुळे गावात लाखोंची उलाढाल झाली.

रथ मिरवणुकीदरम्यान नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये होमगार्ड, अतिरिक्त पोलिस कर्मचारी, तसेच महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी सतत कार्यरत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध