Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

तब्बल ३२८ वर्षांची परंपरा – बेटावद येथील मोठे व लहान बालाजी भगवान रथोत्सव मिरवणुक उद्या शुक्रवारी



शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गाव धार्मिक परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. याच भूमीत तब्बल ३२८ वर्षांची अखंड परंपरा जपणारा मोठ्या व लहान बालाजी महाराजांचा रथोत्सव यंदा दि. ०३ ऑक्टोबर २०२५ वार शुक्रवार व दि. ०४ ऑक्टोबर २०२५ वार शनिवार रोजी मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे.

गावातील दोन प्रमुख देवस्थानं  संस्थान म्हणजेच मोठे बालाजी मंदिर व लहान बालाजी मंदिरसंस्थान यांच्या वतीने नवरात्र घटस्थापनेपासून विविध दिमाखदार वहनांची भव्य मिरवणूक आयोजित केली जाते. या वहनांमध्ये मोर, सिंह, हत्ती, गरुड, शेषनाग, सूर्य, विमान मारुती, चंद्रमा, सप्तमुखी घोडा आदी पारंपरिक सजवलेली वहनं असतात. दसर्‍याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या बालाजींचा आणि तिसऱ्या दिवशी लहान बालाजींचा रथ प्रस्थान करतो.

रथयात्रा सकाळी अकरा वाजता स्टेट बँकेजवळून सुरुवात होऊन ग्रामपंचायत कार्यालय, शनिमंदिर, विठ्ठल मंदिर, माळीवाडा, भोईवाडा, जोगेश्वरी मंदिर, काका सट भिलाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जैन मंदिर मेन बाजारपेठ या मार्गाने रात्री उशिरा म्हणजेच साधारणपणे एक ते दोन वाजेपर्यंत स्वगृही दाखल होते. या संपूर्ण मार्गावर भक्तीमय वातावरण निर्माण होतं, प्रत्येक घराघरांतून बालाजी महाराजांची आरती केली जाते.आरतीच्या वेळेस नारळ व केळी बालाजीना अर्पण केले जाते

या वेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री सो. जयकुमार भाऊ रावल साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत मोठे बालाजी संस्थानचे अध्यक्ष प्रकाश दामु माळी, ग्रामपंचायत सरपंच मंगलचंद जैन, लहान बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष महावीर जैन, उपाध्यक्ष बसंत माळी यांच्यासह भाजप चे कामगार मोर्चा सरचिटणीस महेश पाटील, बेटावद ग्रामसेवक प्रमोद खलाणे, जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

मोठा व लहान बालाजी महाराजांचा रथ हा गावाच्या परंपरेचा आणि अभिमानाचा मानबिंदू मानला जातो. दोन्ही रथांवर अप्रतिम कोरीव नक्षीकाम करण्यात आलेले आहे. या रथांची उंची २५ ते ३० फूट असून वजनही प्रचंड आहे. प्रत्येकी चार चाके असलेल्या या रथांना नियंत्रित करण्यासाठी खास ‘मोगरी’ लावण्यात येते. मोगरी लावणे व रथ नियंत्रित करणे ही जबाबदारी अत्यंत कौशल्यपूर्ण मानली जाते.

रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात मोठा उत्सवी मेळावा भरतो. जिल्हा बँकेजवळ व चिंचेच्या झाडाजवळ विविध प्रकारची दुकाने, हॉटेल, कटलरी शॉप्स लावली जातात. तसेच रथ मार्गावर भाविकांसाठी केळीची दुकाने मोठ्या प्रमाणात लागतात, कारण बालाजी भगवानांना केळीचे प्रसाद म्हणून महत्त्व आहे.

याचसोबत एक आगळा-वेगळा धार्मिक विधी म्हणजे ‘तोला करणे’ या काळात मोठ्या श्रद्धेने पार पाडला जातो. ज्या भाविकांची अपत्यप्राप्तीची मनोकामना पूर्ण होते, ते आपल्या बाळाच्या वजनाएवढा केळीचा तोल रथाजवळ लावून तो प्रसाद स्वरूपात अर्पण करतात. या विधीला अपार धार्मिक महत्त्व असून दरवर्षी अनेक कुटुंबं यात सहभागी होतात.

या रथ यात्रा उत्सव दरम्यान हजारो भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सु व्यवस्था  अबधित ठेवण्यासाठी नरडाणा पोलीस स्टेशन चेसहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक, नरडाणा व बेटावद आऊट पोस्ट चे कर्मचारी, तसेच होम गार्ड पथक  कार्यरत राहणार आहेत.

यंदाही हजारो भाविक बेटावद व परिसरातील खेड्यापाड्यांतून तसेच दूरदूरच्या भागांतून रथयात्रेत सहभागी होणार असून, पाच पावली का असेना रथ ओढण्याचे भाग्य मिळवून स्वतःला धन्य मानतात गावात संपूर्ण वातावरण भक्तिरसाने आणि उत्साह चे राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध