Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

अमळनेरचे राजू सुदाम पारधी उर्फ (राज दाभाडे) राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव, एक लाखाचे पारितोषिक


अमळनेर प्रतिनीधी:भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भगवान बिरसा कला मंचतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेल्या भव्य आणि प्रतिष्ठेच्या कला स्पर्धेत अमळनेर शहरातील “रिलस्टार राज” म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या राजू सुदाम पारधी उर्फ राज दाभाडे यांनी आपल्या अप्रतिम सर्जनशक्तीने राज्यभरातील हजारो स्पर्धकांमध्ये द्वितीय स्थान पटकावले. तब्बल २४ हजार स्पर्धकांच्या गर्दीतून उभे राहणे ही स्वतःमध्येच एक वेगळी कामगिरी; पण राज दाभाडे यांनी आदिवासी समाजाच्या जीवनमूल्यांना उजाळा देणारी जिवंत, भावस्पर्शी आणि संदेशप्रधान रील साकारून परीक्षकांच्या मनावर अशी छाप टाकली की निकाल जाहीर होताच त्यांनी द्वितीय क्रमांक निश्चित मिळवला हे सर्वांनाच स्पष्ट झाले.

आदिवासी समाजाच्या रुढी, परंपरा, संस्कार आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचे त्यांनी केलेले सखोल चित्रण पाहून पर्यवेक्षक ते प्रेक्षक सर्वच भारावून गेले. आदिवासी जीवनातील साधेपणा, आदर्श आणि संघर्षाला दिलेला कलात्मक स्पर्श इतका प्रभावी होता की स्पर्धा केवळ निवड प्रक्रियेतून नव्हे तर भावनांच्या प्रवासातून गेल्यासारखी जाणवत होती. या रीलमधून उमटलेला आदिवासी संस्कृतीचा सन्मान आणि त्या समाजाशी असलेली आत्मीयता हीच त्यांच्या विजयी प्रदर्शनाची खरी ओळख ठरली.

स्पर्धेचा निकाल १५ तारखेला अधिकृतरीत्या जाहीर झाला आणि १६ तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते भव्य सन्मान समारोह पार पडला. या सोहळ्यात राज दाभाडे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल आणि तब्बल एक लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. राज्यातील सर्वोच्च दर्जाच्या या पुरस्काराने त्यांचे कला क्षेत्रातील योगदान अधिक उजळून निघाले.

मूळचे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कोळगाव पथराड येथील असलेल्या राज दाभाडे यांचा प्रवास साधेपणातून सुरू झाला; मात्र अमळनेरमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने स्वतःची प्रतिभा विकसित केली. आज त्यांच्या या कामगिरीने अमळनेर शहरासह संपूर्ण परिसर अभिमानाने उभा आहे. नातेवाईक, गावकरी, मित्रमंडळी तसेच कला क्षेत्रातील विविध मान्यवर कलाकार त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत असून सामाजिक माध्यमांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राज दाभाडे यांनी आपल्या कलेद्वारे केवळ पुरस्कार जिंकला नाही, तर आदिवासी संस्कृतीचा गौरव राज्यभर पोहोचवला आणि समाजात कलामाध्यमातून सकारात्मक संदेश देण्याची आपली बांधिलकीही अधोरेखित केली. त्यांच्या या यशामुळे भविष्यात अनेक तरुण कलाकारांना प्रेरणा मिळेल, यात शंका नाही. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध