Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

सनस्टार मका फॅक्टरीकडून शेतकऱ्यांची लूट ! ! हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी – करवंद, ता. शिरपूर परिसरातील शेतकरी संतप्त..!



शिरपूर प्रतिनिधी / करवंद (ता.शिरपूर) येथे कार्यरत असलेल्या सनस्टार मका फॅक्टरीने शेतकऱ्यांच्या मका उत्पादानाला हमीभावापेक्षा कमी दर देत मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा दिल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाची सरळ पायमल्ली करत कमी दरात खरेदी केल्यामुळे शेतकरी हतबल झाले असून परिसरात संतापाची लाट पसरली आहे.


स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, उत्पादन खर्च वाढलेला असताना कंपनीकडून दिले जाणारे दर हास्यास्पद असून थेट शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा हा प्रकार आहे. महिनेभर कष्ट करून घडवलेल्या पिकाला बाजारभाव मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा; मात्र कंपनीकडून ‘जबरदस्तीचा कमी दर’ लादला जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

शासनाकडे हमीभावाचे स्पष्ट नियम असताना कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

– करवंद, ता. शिरपूर परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट; न्यायाची अपेक्षा!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध