Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

बोगस शालार्थ घोटाळ्यात अमळनेरातून एक ताब्यात; शरद शिंदे–किरण पाटील फरारच! शिक्षण विभागात खळबळ



जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राची विश्वासार्हता हादरवणाऱ्या बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्याने गंभीर वळण घेतले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने अमळनेरातून एकाला ताब्यात घेतले असले, तरी या प्रकरणातील प्रमुख आरोपी शरद शिंदे आणि किरण पाटील पोलिसांना चकवा देत अद्याप फरार आहेत. शिक्षण विभागातील मोठमोठी नावे या प्रकरणाशी जोडली जात असल्याची चर्चा अधिक तापत असून, घोटाळ्याचा व्याप किती खोलवर आहे हे उघडकीस येत चालले आहे.

नाशिक रोड पोलिस ठाण्यात पे युनिट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसह पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्यावर देखील गुन्हा नोंद आहे. मोठे अधिकारी, संस्थाचालक आणि त्यांचे सहकारी यांच्या संगनमतातून हा प्रकार अनेक वर्षे सुरू राहिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र नोटीस बजावूनही एकही मुख्याध्यापक चौकशीसाठी हजर न होणे, हीच संशयाची ठळक खूण आहे. विभागातील स्वच्छता मोहीम अद्याप सुरू होण्याआधीच अनेकांचे घाम पुसले जात असल्याचे चित्र आहे.
या प्रकरणाला आता गती मिळणार की पुन्हा ढकलाढकली होणार? हा खरा प्रश्न

या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात पे युनिट कार्यालय अधीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल असून, तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्यावरही गंभीर गुन्हा नोंदीत समाविष्ट आहे. शरद शिंदे, किरण पाटील आणि अविनाश पाटील या तिघांचेही नावे आरोपी यादीत आहेत.

घोटाळ्याचा माग काढण्यासाठी गेल्या आठवड्यापासून EOW ची पथके अमळनेरसह जिल्ह्यात दोनदा मोहीम राबवून गेली. शनिवारी केलेल्या कारवाईत अविनाश पाटील ताब्यात आला; मात्र शिंदे–पाटील जोडगोळीचा सुगावा अजूनही लागत नाही.

शिक्षण विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांची नावेही या प्रकरणाशी जोडली गेल्याची चर्चा आता वेग घेत आहे. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, EOW कडून जारी केलेल्या नोटीसला प्रतिसाद देत एकही मुख्याध्यापक चौकशीसाठी हजर झाले नसल्याने तपास यंत्रणेत संताप व्यक्त केला जात आहे. त्यांना नव्याने नोटीस देण्याच्या हालचाली सुरू आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध