शिरपूर प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील हिंदू प्रवक्त्या व सामाजिक कार्यकर्त्या कु. हर्षदा ठाकुर यांच्यावर झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याचा निषेध शिरपूर तालुक्यात व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात शिरपूर तहसील कार्यालयात तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कु. हर्षदा ठाकुर या गेल्या काही वर्षांपासून समाजजागृतीचे कार्य करीत असून, विशेषतः युवक–युवतींमध्ये सामाजिक विषयांवर प्रबोधन करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना मागील काही काळापासून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून, माध्यमांतूनही याबाबत वृत्त प्रसारित झाले आहे.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले की, काही व्यक्तींकडून फोनद्वारे धमकावण्यात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत असून, अद्याप दोषींवर ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
यावेळी संबंधितांनी प्रशासनाकडे मागणी केली की, कु. हर्षदा ठाकुर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच समाजात महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत.
तहसील प्रशासनाने निवेदन स्वीकारून ते वरिष्ठ स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा