Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

पोलिस चौकीसमोरच अपघातग्रस्त कंटेनरची लूट दोन दुचाकींसह लाखोंचा मुद्देमाल चोरीस; पोलिसांच्या निष्क्रियतेवर गंभीर आरोप



पळासनेर शिरपूर प्रतिनिधी- बिजासन घाट परिसरात अपघातग्रस्त अवस्थेत उभ्या असलेल्या कंटेनर वाहनाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींसह सुमारे १ लाख १६ हजार रुपयांचे मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची घटना ही केवळ चोरी नसून, पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्न उपस्थित करणारी गंभीर बाब ठरली आहे. कारण ही लूट पोलीस चौकीपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर घडली असूनही पोलिसांना याची वेळेत दखल घेता आली नाही.

शिरपूर तालुक्यातील मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील विजासन घाटात दिनांक १२ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता राजस्थानहून तमिळनाडूकडे जात असलेला कंटेनर अपघातग्रस्त झाला होता. कंटेनरमध्ये हिरो कंपनीच्या मोटरसायकली वाहतूक होत होत्या. या अपघातात चालक राजू कुमार यादव (वय ३५, रा. लसारीपुर, पोस्ट कलवारी, ता. कोटी, जि. मुझफ्फरपूर, बिहार) हा गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर जखमी चालकाला उपचारासाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अपघातग्रस्त कंटेनरची संरक्षणाची कोणतीही ठोस व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली नाही, असा आरोप पुढे येत आहे. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कंटेनरचे कुलूप तोडले आणि दोन दुचाकींसह मौल्यवान साहित्य लंपास केले.

सकाळी उपचारानंतर कंटेनरजवळ परत आलेल्या चालकाला चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पोलिस चौकी इतक्या जवळ असताना, गस्त, पहारा अथवा सीसीटीव्ही निरीक्षण नसणे हे पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण असल्याची तीव्र प्रतिक्रिया वाहनचालक व स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलीस चौकी असतानाही वाहन सुरक्षित नसतील तर चालकांनी संरक्षणासाठी कोणाकडे पाहावे? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी घटना टाळण्यात पोलिस अपयशी ठरले असल्याची चर्चा तीव्र झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध