Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

दहिवद ग्रामपंचायतीच्या वृक्षलागवडीची शास्त्रज्ञांकडून पाहणी

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामांचे कौतुक

दहिवद (ता. अमळनेर) | प्रतिनिधी
दहिवद ग्रामपंचायतीअंतर्गत गाव विकास आराखड्यानुसार महात्मा गांधी रोजगार हमी योजना (बिहार पॅटर्न) अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची पाहणी नामवंत शास्त्रज्ञ व तज्ज्ञांच्या उपस्थितीत करण्यात आली.

किमया अग्रो कंपनी प्रा. लि., पुणे यांच्या जळगाव येथील कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त दि. 27 रोजी शास्त्रज्ञ डॉ. विजया पाटील (मा. इंटरनॅशनल रिसर्च हेड – हिंदुस्तान लिव्हर कंपनी), किमया अग्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर, सॉफ्टवेअर इंजिनिअर श्री. मिलिंद बारगजे यांनी सौ. इंजिनिअर संगीता दिनेश पाटील यांच्या सहकार्यातून दहिवद पंचक्रोशीस भेट दिली.

यावेळी तिरखी मारोती मंदिर परिसरातील वृक्षलागवड पाहून महिला मजुरांनी पाहुण्यांचा सत्कार केला. त्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची पाहणी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक श्री. कठले व ग्रामविकास अधिकारी श्री. शेखर धनगर यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.

जिल्हा परिषद मराठी शाळेस भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी करण्यात आली. मुख्याध्यापकांनी समाधान व्यक्त करत सत्कार केला. बचत गट सभागृह, सोनखेडी येथील श्री. दीपक पाटील यांच्या शेतातील डाळिंब पिकाची पाहणी, तसेच आश्रम शाळेजवळील मियावाकी वृक्षलागवड व बिहार पॅटर्न अंतर्गत लावलेल्या वृक्षांची पाहणी करण्यात आली.

या संपूर्ण वृक्षलागवडीसाठी आवश्यक ऑरगॅनिक खत पुरवण्याची जबाबदारी किमया अग्रो  कंपनीने स्वीकारली.
डॉ. विजया पाटील यांनी महिला बचत गटांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी जांभूळ, महुआ कँडीसारख्या मूल्यवर्धित उत्पादनांचे प्रशिक्षण व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

अमळनेर तालुक्यात ऊस व आल्याचे रेसिड्यू-फ्री उत्पादन करून त्यापासून ऑर्गॅनिक गूळ पावडर व आलं पावडर तयार करून एक्सपोर्ट प्रकल्प उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यामुळे लवकरच परिसरातील शेतकऱ्यांचा माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी श्री. दिनेश पाटील (माजी सदस्य, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली), श्री. सुभाष देसले (माजी सभापती, पं. स. अमळनेर), श्री. प्रविण काशिनाथ माळी (मा. उपसरपंच), श्री. ईश्वर माळी (मा. चेअरमन, विकासकारी सोसायटी), श्री. गोकुळ माळी, श्री. शिवाजी पारधी, श्री. रवींद्र शेलकर, श्री. भागवत सोनवणे यांच्यासह महिला-पुरुष मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध