Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ डिसेंबर, २०२५

गॅस सिलेंडरच्या अवैध साठ्यावर मुंबई रेशनिंग विभागाची मोठी कारवाई



मुंबई प्रतिनिधी मुंबई–ठाणे शिधावाटप क्षेत्रात गॅस सिलेंडरच्या अवैध साठवणूक व विक्रीचा गंभीर प्रकार उघडकीस आणत मुंबई रेशनिंग विभागाच्या दक्षता पथकाने डोंबिवली एमआयडीसी परिसरात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत विविध कंपन्यांचे १,८३९ घरगुती व व्यावसायिक वापराचे एलपीजी सिलेंडर तसेच ७ बंद अवस्थेतील वाहने जप्त करण्यात आली असून, ₹६७.१४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ तसेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस (रेग्युलेशन ऑफ सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन) ऑर्डर, २००० अंतर्गत करण्यात आली आहे.

एमआयडीसी परिसरात विनापरवाना धोकादायक साठवणूक

दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई रेशनिंग विभागाचे दक्षता पथक गस्तीवर असताना, सर्वे नं. ८०/२, पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ, एमआयडीसी फेज-२, डोंबिवली (पूर्व) येथे बंद वाहनांमध्ये तसेच अवैध गोदामवजा शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरची साठवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

हा परिसर डोंबिवली एमआयडीसी झोनमध्ये असून, कोणत्याही विभागाची अधिकृत परवानगी न घेता खुल्या जागेत गॅस सिलेंडरची साठवणूक व विक्री सुरू असल्याचे तपासात स्पष्ट झाले. विस्फोटक विभाग, अग्निशमन विभाग किंवा संबंधित गॅस कंपन्यांची कोणतीही परवानगी अथवा कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळून आले.

जीवित व वित्तहानीचा गंभीर धोका

अधिकाऱ्यांच्या प्राथमिक पाहणीत हा साठा अतिज्वलनशील आणि अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. गॅस गळती झाल्यास मोठ्या प्रमाणावर स्फोट, जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची दाट शक्यता असल्याने तत्काळ पंचनामा करून कारवाई करण्यात आली.

या कारवाईत अक्षया गॅस एजन्सी, मधुकृष्ण गॅस एजन्सी, स्वराज गॅस डिस्ट्रीब्युटर, तृप्ती गॅस एजन्सी आणि लकी एंटरप्राईजेस यांच्या मालकीचे सिलेंडर जप्त करण्यात आले.

गुन्हा दाखल; संबंधित एजन्सींच्या मालकांवर कारवाई

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली एमआयडीसी (जिल्हा ठाणे) येथे गुन्हा क्रमांक १५२२/२०२५ नोंदवण्यात आला असून, संबंधित एजन्सीचे मालक व गोदाम कीपर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या कारवाईची फिर्याद शिधावाटप अधिकारी दीपक डोळस यांनी नोंदवली आहे.

दक्षता पथक आणि पोलिसांचा समन्वय

या संयुक्त कारवाईत नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयाच्या फिरत्या पथकातील
शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, राजेश सोरते, विकास नागदिवे, देवानंद थोरवे, पवन कुंभले, रविंद्र राठोड,
तसेच शिधावाटप कार्यालय क्र. ३९ (फ), डोंबिवली (पूर्व) येथील अधिकारी व मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारवाईचा इशारा

नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई – चंद्रकांत डांगे (भा.प्र.से.) यांनी सांगितले की, अशा प्रकारची अवैध साठवणूक व विक्री सहन केली जाणार नाही, आणि नागरिकांच्या जीवित सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध