Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

शिरपूर तालुक्यात PWD–वनविभागाची संगनमताने ‘महासुलाची कत्तल’; लाखोंचा सरकारी महसूल हडप ?



शिरपूर प्रतिनिधी- तालुक्यात तऱ्हाडी पासून गलंगी फाट्यापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गालगत दशके-दशकं उभ्या असलेल्या चिंच, वड, निम, लिंबांसारख्या डोलदार वृक्षांची निर्घृण कत्तल सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि वनविभागातील अधिकाऱ्यांचे उघड उघड संगनमत समोर येत असल्याचे गंभीर आरोप होत आहेत.

फांद्या छाटण्याच्या नावाखाली पूर्ण वृक्ष ‘अपंग’

PWD अधिकाऱ्यांनी वनविभागाकडून फक्त फांद्या छाटण्याची परवानगी घेतली. परंतु प्रत्यक्षात जे सुरू आहे ते म्हणजे "वृक्षांचे अवयव छाटून केलेली जिवंत कत्तल".
ज्या पद्धतीने एखाद्या माणसाचे हात–पाय कापले जातात, त्याच पद्धतीने संपूर्ण झाडांचे अवयव छाटून फक्त उभट बुंधे ठेवले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे.

लालसेपोटी PWD–वनविभागाचा ‘काळाबाजार गठबंधन’ उघड?

● परवानगी होती फक्त फांद्या छाटण्याची
● परंतु होत आहे ट्रकभर लाकूड बाहेर
● लिलावाचं नामोनिशान नाही
● लाकूड व्यापाऱ्यांच्या ‘डील’नुसार रात्रीची अवैध वाहतूक
● शिरपूर – शिंदखेडा – दोंडाईचा मार्गावर रोजच्या रोज ‘सायंकालीन शटल’

स्थानिकांच्या मते, ही कार्यपद्धती म्हणजे "कुंपणाच शेत खातंय" याचं जिवंत उदाहरण आहे. व्यापाऱ्यांनी वरपासून खालपर्यंत पैसे फिरवल्याची चर्चा आता सार्वजनिकपणे होत आहे.

बोराडी व शिरपूर वनक्षेत्रातील अधिकारी थेट व्यापाऱ्यांच्या ताब्यात?

नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीवरून राज्यभर राजकारण तापलेले असताना, शिरपूर–बोराडी वनक्षेत्रातील अधिकारी मात्र वृक्षतोड माफियांच्या हुकुमशाहीखाली काम करत असल्याची परिस्थिती दिसत आहे.

सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनपाल अधिकारी — सर्वच या ‘तोडीच्या चक्रात’ आर्थिक फायद्यासाठी गुंतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

महसूल कुठे? लाखोंचं लाकूड परवानगीशिवाय गायब

नियमाप्रमाणे —
फांद्यांमधून मिळालेलं लाकूड एकत्र करून, वनविभागाच्या देखरेखीखाली योग्य दराने लिलाव करणे बंधनकारक आहे.

परंतु इथे लिलाव नाही, नियम नाही, हिशेब नाही, आणि महसूल शून्य.
परंतु रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकांमध्ये लाखोंचा माल मात्र दररोज बाहेर.

धुळे उपवनसंरक्षक कार्यालयालाही या लुटमारीचा वास नाही की नाहीसा केला जात आहे, हा मोठा प्रश्न आहे.

जनतेचा उद्रेक: “झाडं तरी सोडा! पर्यावरणाचा गळा घोटू नका!”

तरुणाई आणि पर्यावरणवादी संघटनांनी एकत्र येत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभागाला खुले पत्र दिले आहे:

“शिरपूरची हिरवाई नष्ट करू नका! कमीत कमी जिवंत झाड तरी वाचवा. सार्वजनिक विभागांनी जनतेच्या भावना जाणून दया दाखवा.”

धुळे उपवनसंरक्षकांकडे मागणी: कठोर चौकशी व निलंबन

– शिरपूर व बोराडी वनक्षेत्रातील सर्व संबंधित अधिकारी
– झाडतोडीला परवानगी देणारे PWD अधिकारी
– आणि अवैधरित्या लाकूड वाहतूक करणारे व्यापारी

या सर्वांवर तुरंत, निष्पक्ष आणि कठोर चौकशी करण्याची जनमानसाची जोरदार मागणी आहे.

जशी चौकशी अलीकडेच शिंदखेळा वृक्षतोड प्रकरणात करण्यात आली, तशीच जलद गतीने चौकशी करून दोषींवर निलंबनासह गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध