Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

शिरपूर टोल प्लाझावर 'रस्ता सुरक्षा महिना' उत्साहात साजरा; मृत्युंजय दूतांचा गौरव व वाहनधारकांची आरोग्य तपासणी



​शिरपूर प्रतिनिधी : रस्ते सुरक्षा आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने शिरपूर टोल प्लाझा येथे ३७ व्या रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या उपक्रमांतर्गत अपघाताच्या वेळी तातडीने मदतीसाठी धावून जाणाऱ्या 'मृत्युंजय दूतांचा' विशेष गौरव करण्यात आला असून, महामार्गावरील वाहनधारकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आले.

​शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवर रस्ता सुरक्षेचे आवाहन करणारे पोस्टर्स लावण्यात आले. तसेच रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी वाहनांच्या मागील बाजूस रेडियम स्टिकर्स लावण्याची मोहीम राबवण्यात आली.

​या मोहिमेत महामार्ग सुरक्षा पोलीस, ट्रक चालक आणि टोल प्लाझा कर्मचाऱ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डीपीटीपीएलच्या प्रकल्प प्रमुख दीपा मदैया यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर टोल प्लाझाचे व्यवस्थापक विजय ठाकूर, फणी सर, प्रवीण घुमणे, सूर्यकुमार महाले, लाला पुरोहित आणि शिवाजी पाटील यांनी सहकार्य केले.


"रस्त्यावरील सुरक्षा ही केवळ नियमावली नसून ती जीवनाची हमी आहे. प्रत्येकाने नियमांचे पालन केल्यास अपघातांचे सत्र नक्कीच थांबवता येईल." - सुनील गोसावी डिवायएसपी शिरपूर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध