Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

शिरपूर शहर पोलिसांची कामगिरी;दोन मोटारसायकलसह चोरटा व विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात



शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही दिवसांत दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या कारवाईत १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या असून, एका आरोपीला अटक तर एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पहिली कारवाई: योग ट्रॅक्टर शोरूमसमोरील चोरी उघड
पहिली घटना शिरपूर फाटा येथील योग ट्रॅक्टर शोरूमसमोर घडली होती. फिर्यादी रवींद्र अनिल चौधरी यांची ८० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न (MH 39 AG 5722) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.

पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना, पोलीस हवालदार रवींद्र आखडमल यांना गुप्त माहिती मिळाली की, महेंद्र मुकुंद बुवा (रा. आमोदे, ता. शिरपूर) याने ही दुचाकी चोरली आहे. पोलिसांनी आमोदे गावच्या कमानजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, आमोदे शिवारातील जंगलात लपवून ठेवलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

दुसरी कारवाई: हॉटेल भाऊ समोरून चोरी गेलेली दुचाकी हस्तगत

दुसरी घटना ६ जानेवारी रोजी 'भाऊ हॉटेल' समोर घडली होती. हिमांशू राजेंद्र माळी यांची ४५ हजार रुपये किमतीची हिरो एच.एफ. डिलक्स (MH 18 AR 2428) चोरीला गेली होती.

या गुन्ह्याचा तपास करत असताना, लाल जॅकेट घातलेला एक संशयित उंटावदकडून शिरपूरकडे येत असल्याची माहिती पथकाला मिळाली. शनि मंदिर परिसरात सापळा लावून पोलिसांनी एका संशयिताला थांबवले. चौकशीत तो विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे समोर आले. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून, या गुन्ह्याची देखील उकल झाली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, रवींद्र आखडमल, योगेश दाभाडे, भटू साळुंके, विनोद आखडमल, गोविंद कोळी, सचिन वाघ, मनोज महाजन, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, सोमा ठाकरे आणि आरीफ तडवी यांच्या पथकाने केली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध