Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ४ जानेवारी, २०२६

तऱ्हाड कसबे येथे शाळेच्या आवारातच ग्रामपंचायतीचा ठिय्या; नवीन इमारत वापराविना धूळखात, प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर



​शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील तऱ्हाड कसबे येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच गेल्या ३५ वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालय सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नुकतीच शिरपूरचे गटविकास अधिकारी  प्रदीप पवार यांनी या परिसराला भेट दिल्याने हा प्रलंबित मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १९९० पासून ही ग्रामपंचायत शाळा आणि वर्गखोल्यांना लागूनच भरत आहे. यामुळे कार्यालयात होणारी ग्रामस्थांची वर्दळ, बैठका, ग्रामसभांमधील वादावादी आणि राजकीय वातावरणाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या बालमनावर होत आहे. 

विशेष म्हणजे, १५ वर्षांपूर्वी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन आमदार अमरीशभाई पटेल आणि काशिराम पावरा यांच्या प्रयत्नातून गावात मारुती मंदिराशेजारी लाखो रुपये खर्चून नवीन सुसज्ज इमारत उभारण्यात आली होती. या इमारतीचे उद्घाटन होऊनही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे तिथे आजपर्यंत एकही दिवस कार्यालयीन कामकाज चालले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

​शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च झालेली इमारत वापरात नसताना, मागील वर्षी पुन्हा नवीन ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी मंजूर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका बाजूला सुसज्ज इमारत उपलब्ध असताना पुन्हा नवीन निधी कशासाठी, असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. शाळेच्या आवारात ग्रामपंचायत असल्याने आजवर देखभाल-दुरुस्तीवर झालेला खर्च हा केवळ सार्वजनिक निधीचा अपव्यय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी तटस्थ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि जुन्या इमारतीत कार्यालय स्थलांतरित करून विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण द्यावे, अशी मागणी तऱ्हाड कसबे येथील ग्रामस्थांनी लावून धरली आहे.


*ग्रामपंचायत प्रशासन कोणाला फसवतेय ग्रामस्थांना की,शासनाला ?*

■ *नवीन इमारतीचा विनियोग शून्य:*

१५ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून नवीन, सुसज्ज ग्रामपंचायत इमारत बांधली गेली, जिचे उद्घाटनही झाले. मात्र, आजपर्यंत या इमारतीचा वापर करण्यात आलेला नाही.
-------------------------------

■ निधीचा अपव्यय व संशयास्पद कारभार:

आधीची इमारत रिकामी असताना पुन्हा नवीन कार्यालयासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला असून सार्वजनिक निधीच्या गैरवापराचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध