Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ जानेवारी, २०२६

शिरपूर तालुक्यातील हाळाखेळ RTO चेक नाका की वसुली केंद्र? ओव्हरलोड वाहनांच्या नावाखाली बेकायदेशीर पैशांचा खेळ; ‘पटर’ कुणाच्या छत्राखाली?



शिरपूर प्रतिनिधी- तालुक्यातील हाळाखेळ येथील RTO तपासणी नाका सध्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडला आहे. वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी येथे ओव्हरलोड वाहनांकडून नियमबाह्य पैसे वसूल करण्याचा नवा पॅटर्न सुरू असल्याचे आरोप वाहनचालक व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून केले जात आहेत.

प्राप्त माहितीनुसार, चेक नाक्यावर थेट कारवाई न करता काही मध्यस्थ दलाल – ज्यांना स्थानिक भाषेत ‘पटर’ म्हटले जाते – चालकांशी संपर्क साधतात. दंड, गुन्हा नोंद किंवा वाहन जप्तीची भीती दाखवत रोख रकमेत ‘सेटलमेंट’ केली जात असल्याचा आरोप समोर आला आहे.

विशेष म्हणजे,

अधिकृत दंडाची पावती दिली जात नाही,
कारवाईची नोंद कागदोपत्री होत नाही,
पैसे दिल्यानंतर वाहन सरळ सोडले जाते,
असे अनेक वाहनचालकांचे म्हणणे आहे.
एका वाहनचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “नियम लागू करायचे असतील तर दंड भरा, नाहीतर तासन्‌तास गाडी अडवून ठेवली जाते. त्यामुळे नाईलाजाने पैसे द्यावे लागतात.”
या प्रकारामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत— हे ‘पटर’ नेमके कोण आहेत?
त्यांना चेक नाक्यावर मोकळा वावर कोणाच्या परवानगीने आहे?
दररोज वसूल होणारी रक्कम कुठे आणि कोणाकडे जाते? RTO प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का?
हाळाखेळ RTO चेक नाक्यावरील हा कथित प्रकार सामान्य वाहनचालकांसाठी आर्थिक पिळवणूक ठरत असल्याची भावना वाढत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, CCTV फुटेजची तपासणी, आणि दलालांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नियमांची अंमलबजावणी नसेल, तर अशा चेक नाक्यांचा उपयोग नेमका कुणासाठी? हा सवाल शिरपूर तालुक्यातील नागरिक उपस्थित करत आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध