Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

हाडाखेड सीमा तपासणी नाका : ‘तपासणी’पेक्षा वसुलीचाच उद्योग जोरात!



शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुका महाराष्ट्राच्या उत्तर टोकावर असून गुजरात व मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सीमेला लागून आहे. मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्ग तालुक्यातून जात असल्याने या मार्गावर रात्रंदिवस प्रचंड वाहनवाहतूक असते. परराज्यातून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी तालुक्यातील हाडाखेड येथे प्रादेशिक परिवहन विभागाचा सीमा तपासणी नाका गेल्या अनेक वर्षांपासून २४ तास सुरू आहे. मात्र या तपासणी नाक्यावर अवैध वाहतूक रोखण्याऐवजी खुलेआम ‘अर्थपूर्ण तडजोडी’ सुरू असल्याच्या चर्चा अनेक वर्षांपासून होत आहेत. काही वर्षांपूर्वी टीव्ही वाहिन्यांनी स्टिंग ऑपरेशन करूनही कोणताही ठोस पायबंद बसलेला नाही. हाडाखेड तपासणी नाक्यावर दररोज लाखो रुपयांची अवैध उलाढाल होत असल्याचे बोलले जाते. तपासणीच्या नावाखाली ट्रक व इतर अवजड वाहनांना तासन्‌तास अडवून ठेवले जाते. विरोध करणाऱ्या वाहनधारकांवर ‘पंटर’ मार्फत दबाव टाकला जातो. परिणामी राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे.

अलीकडच्या काळात या तपासणी नाक्यामुळे घडलेल्या अपघातांच्या घटनांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही दिवसांपूर्वी अपघातग्रस्त जखमींना घेऊन जाणारी रुग्णवाहिका तपासणी नाक्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत तब्बल वीस मिनिटे अडकून पडली होती. मात्र नाक्यावर उपस्थित असलेल्या एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा करून देण्याची तत्परता दाखवली नाही. अखेर काही सुज्ञ वाहनधारकांनी पुढाकार घेऊन वाट काढून दिली. या घटनेमुळे तपासणी नाक्याबाबत जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तपासणी नाक्याच्या आतील बाजूनेच लहान वाहनांनाही जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या ठिकाणी मोठे गतिरोधक व खोल खड्डे असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. काही दिवसांपूर्वी खड्डे चुकवताना कारवरील नियंत्रण सुटून ती पुढील कंटेनरवर आदळली. या अपघातात एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तपासणी नाका व महामार्ग यांना जोडणारा सुमारे १२ मीटर रुंदीचा रस्ता तपासणी नाक्याच्या अखत्यारीत येत असून, त्यावरील खड्डे आजतागायत बुजवण्यात आलेले नाहीत. राज्यातील सुमारे २२ सीमा तपासणी नाक्यांपैकी हाडाखेड नाका एक असून, तो प्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारीत येतो. गेल्या वर्षभरापासून राज्यातील तपासणी नाके खासगी संस्थांच्या ताब्यात दिल्याचीही चर्चा आहे. असे असतानाही हाडाखेड नाक्यावरील गैरप्रकार थांबताना दिसत नाहीत. तपासणी नाका अवैध वाहतूक रोखण्यासाठी आहे की अवैध वसुलीसाठी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

हाडाखेड तपासणी नाक्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि जीवितहानी लक्षात घेता स्थानिक आमदार व प्रशासनाने तातडीने या नाक्याची सखोल व निष्पक्ष तपासणी करणे आवश्यक आहे. इमानेइतबारे तपासणी झाल्यास येथे सुरू असलेली आर्थिक लूट, वसुलीचे जाळे आणि त्यातून निर्माण होणारे गंभीर धोके जनतेसमोर येतील. अन्यथा खड्डे तसेच राहतील, वसुली सुरू राहील आणि निष्पाप नागरिकांचे बळी जात राहतील, अशी तीव्र भावना शिरपूर तालुक्यात व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध