Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १२ जानेवारी, २०२६

राष्ट्र सेवेतील शिलेदारांसाठी आयोजित आरोग्य शिबीर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात संपन्न



शिरपूर | प्रतिनिधी
राष्ट्रसेवा बजावत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणाऱ्या पोलिस व पत्रकार बांधवांसाठी आरोग्य तपासणीचा एक स्तुत्य सामाजिक उपक्रम  आज दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात संपन्न झाला.

चंदन आबा फाऊंडेशन, गंगाई चिल्ड्रेन हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर दिपक विजयसिंह गिरासे यांच्या संकल्पनेतून व दैनिक राष्ट्र उदय यांच्या संयुक्त विद्यमाने, दैनिक राष्ट्र उदयच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त पोलिस व पत्रकारांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रात्रंदिवस समाजाच्या सुरक्षेसाठी आणि सत्याच्या सेवेसाठी अविरत झटणाऱ्या पोलिस व पत्रकारांचे आरोग्य सुदृढ राहावे, या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला.

धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढत असताना, वेळेवर तपासणी व मार्गदर्शन मिळावे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या शिबिरात हृदयरोग व मधुमेह विषयातील तज्ज्ञ डॉक्टर्स डॉ. पितांबर दिघोरे सर, डॉ.अमित गुजराथी सर व डॉ. विनोद पावरा सर यांनी आपली आरोग्य सेवा दिली.

यावेळी उपस्थित पत्रकार बांधव आणि पोलीस बांधव व अधिकारी वर्ग या सर्वांची आरोग्य तपासणी, मधुमेह, उच्च रक्तदाब, ईसीजी व अन्य तपासण्या करून वैद्यकीय निदान करण्यात आले. तसेच अति अत्यावश्यक वेळेस प्राथमिक उपचार म्हणून सी पी आर देण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन देखील करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी, पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दरवडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, इत्यादींची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस टुडेचे संपादक रत्नदीप सिसोदिया यांनी केले, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉक्टर दिपक विजयसिंह गिरासे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध