Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांचा धुमाकूळ; ८ शासकीय कर्मचारी जखमी, कोट्यवधींचा दंड अद्यापही थकीत



जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाची छुप्या मार्गाने होणारी वाहतूक थांबवण्यात प्रशासनाला अद्यापही पूर्ण यश मिळालेले नाही. गेल्या ११ महिन्यांत वाळूमाफियांचे धाडस इतके वाढले आहे की, त्यांनी थेट शासकीय यंत्रणेवर हल्ले करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत ८ जीवघेणे हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रशासकीय कारवाईची आकडेवारी (एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६):
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ११ महिन्यांत मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत:
उघड झालेली प्रकरणे: ५८१ अवैध गौण खनिज वाहतुकीची प्रकरणे.
जप्त वाहने: ५७३ वाहने प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत.

दंडात्मक कारवाई: 
एकूण ७ कोटी ५६ लाख रुपयांचा दंड आकारला गेला.
थकीत दंड: एकूण दंडापैकी केवळ ४ कोटी ७६ लाखांची वसुली झाली असून, २ कोटी ८० लाख रुपये अद्यापही थकीत आहेत.
नद्यांच्या पात्रातून राजरोस उपसा
जिल्ह्यात केवळ सात वाळू गटांना अधिकृत परवानगी असतानाही, बहुतांश सर्वच नद्यांच्या पात्रातून अवैध उपसा सुरू आहे. वाकडी (ता. जळगाव) गावाजवळ सोमवारी (१६ फेब्रुवारी) महसूल विभागाचे पथक कारवाईसाठी गेले असता, वाळूचोर ट्रॅक्टरसह पसार झाले. याप्रकरणी सीताराम शिवा पाटील आणि बापू गोविंदा पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कायदेशीर पेच आणि आव्हाने वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने ३७४ प्रकरणांमध्ये 'बॉण्ड' लिहून घेतले असले, तरी १९८ प्रकरणांमधील कायदेशीर प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. महसूल विभाग, तहसीलदार आणि पोलीस यंत्रणा सातत्याने कारवाई करत असूनही, माफियांचे जाळे जिल्ह्यात खोलवर पसरल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध