Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

जळगाव: अडावद वनक्षेत्रात सागवानाची 'कत्तल'; वनपालांच्या आशीर्वादाने कुड्यापाणी परिमंडळात पर्यावरणाचा ऱ्हास?



चोपडा (प्रतिनिधी) यावल वनविभागांतर्गत येणाऱ्या अडावद वनक्षेत्रातील कुड्यापाणी परिमंडळात सध्या अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील कक्ष क्र. १५२, १५३ आणि १५४ मध्ये मौल्यवान सागवृक्षांची बेछुटपणे कत्तल केली जात असून, नवीन अतिक्रमणाचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी पुराव्यानिशी केला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाला संबंधित वनपाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे 'मूक संमती' असल्याचे बोलले जात आहे.

वनपालांचे 'वर्क फ्रॉम जळगाव'; जंगलाकडे पाठ!

कुड्यापाणी परिमंडळाच्या वनपाल श्रीमती भावना नारायण चव्हाण या नेमून दिलेल्या मुख्यालयात राहत नसल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या जळगाव येथून अधूनमधून 'सरप्राईज व्हिजिट' च्या नावाखाली येतात आणि अडावद कार्यालयात बसून मोबाईलद्वारेच कर्मचाऱ्यांना आदेश देऊन पुन्हा जळगावकडे रवाना होतात, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. जंगलात फिरण्याची 'एलर्जी' असल्याने त्यांनी आजवर राखीव वनाची नीट पाहणीच केली नसल्याचे समजते.

५०० हून अधिक सागवान वृक्षांचा बळी; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून या भागात सागवानाची मोठी कत्तल सुरू आहे:
कक्ष क्र. १५२: अंदाजे ५०० हून अधिक तरुण आणि मौल्यवान सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.
कक्ष क्र. १५३ व १५४: येथेही शेकडो झाडे तोडून त्यांचा विस्तार माल पसार करण्यात आला आहे.
तोडलेल्या झाडांचे खुंट जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न दिवसाढवळ्या सुरू आहे. यामुळे वन्यजीवांचे अधिवास धोक्यात आले असून पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे.

कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार?

सन २०२४-२५ या वर्षात कुड्यापाणी परिमंडळात झालेली रोपवनाची ७-८ कामे आणि एल.बी.एस. बंधाऱ्यांची कामे मजुरांऐवजी जेसीबी मशीनद्वारे ठेका पद्धतीने करून घेतल्याचा आरोप आहे. या कामांची बिले मजुरांच्या नावावर न काढता परस्पर काढण्यात आल्याची चर्चा विभागात रंगली आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता आणि वरिष्ठांच्या आदेशांना केराची टोपली दाखवत मनमानी कारभार सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे 'अभय' कोणाला?

या गंभीर प्रकाराबाबत सहाय्यक वनसंरक्षक श्री.महेंद्र पाटील आणि उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख यांच्याकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तक्रारदारांच्या मते, वरिष्ठ अधिकारी या महिला अधिकाऱ्याच्या 'विशाखा समिती' किंवा इतर प्रशासकीय धाकामुळे कारवाई करण्यास कचरत आहेत की यात काही 'अर्थपूर्ण' व्यवहार आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

निलंबनाची मागणी

शासकीय कामात अक्षम्य कुचराई, अवैध वृक्षतोडीला प्रोत्साहन आणि पर्यावरणाचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित वनपाल श्रीमती भावना चव्हाण यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध