Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला भाग पाडू – विजय चोरडिया



व्हॉईस ऑफ मीडिया’ बनली राज्यातील पत्रकारांचा आधार

बापू चव्हाण दिंडोरी 
    
राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करून सरकारला ठोस निर्णय घ्यायला भाग पाडले जाईल,असा इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्यकार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी दिला. 
     
सांगली येथे आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यात त्यांनी पदाधिकारी पत्रकारांशी थेट संवाद साधत संघटनेची भूमिका स्पष्ट केली. राज्यव्यापी संघटन बांधणी आणि पत्रकारांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सुरू असलेल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी सांगितले की, पत्रकारांच्या प्रश्नांबाबत संघटना सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहे;मात्र अद्याप ठोस आणि सकारात्मक निर्णय होत नसल्याने पत्रकारांमध्ये असंतोष वाढत आहे.
        
चोरडिया म्हणाले की,पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी त्यांच्याच मूलभूत हक्कांबाबत शासनाची भूमिका उदासीन आहे. अधिस्वीकृतीचा प्रश्न,पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याण महामंडळ,पेन्शन योजना,सर्वसमावेशक आरोग्य सुविधा,घरकुल योजना अशा अनेक मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.“जोपर्यंत पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही. राज्यभर एकत्रित व संघटित लढा उभारण्यासाठी सर्व पत्रकारांनी एकजूट दाखवावी,”असे ठाम आवाहन त्यांनी केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांना एकत्र आणण्याचे कार्य करत आहे. गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रात संघटनेने पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने प्रयत्न केले असून,निवेदने, बैठका,चर्चासत्रे आणि संघटन विस्तार मोहिमा राबवून पत्रकारांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद केला आहे. संघटनेच्या पंचसूत्री कार्यक्रमांतर्गत पत्रकार कल्याण महामंडळ स्थापन करणे,आरोग्य विमा योजना लागू करणे,निवृत्ती वेतन योजना सुरू करणे,गृहनिर्माण सुविधा उपलब्ध करणे आणि अधिस्वीकृती प्रक्रियेचे सुलभीकरण करणे या मागण्यांवर ठोस अंमलबजावणीची मागणी शासनाकडे करण्यात येत आहे.
       
शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाची दिशा जाहीर केली जाईल,असे स्पष्ट करत चोरडिया यांनी सांगितले की, जिल्हानिहाय बैठका आणि संघटन मजबुतीकरणाच्या माध्यमातून पत्रकारांना संघटित केले जात आहे. आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून लढा देण्याची तयारीही संघटनेने सुरू केली आहे.“पत्रकार सुरक्षित,सक्षम आणि सन्मानाने कार्यरत असतील तरच लोकशाही सुदृढ राहील. पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे लोकशाही कमकुवत करणे होय,”असे त्यांनी नमूद केले.   
       
या बैठकीस विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते,डिजिटल विंगचे प्रदेश अध्यक्ष इर्शाद शेख,जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे,कार्याध्यक्ष गणेश आवळे,सरचिटणीस अल्ताफ, डिजिटल विंगचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक ढवळे,तालुका अध्यक्ष सुनील पाटील,प्रमोद सगरे,गणेश माळी, मुकेश बनसोडे,मच्छिंद्र बाबर, चंद्रकांत जगताप,नितीन कुंभार,जे. वाय.पाटील,रोहित रोकडे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध