Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ६ मार्च, २०२६

धाऊर ग्रामस्थांचे ग्रामपंचायत अधिकार्‍यांविरोधात गटविकास अधिकार्‍यांना निवेदन



दिंडोरी । संदीप अवधूत 

दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथील ग्रामपंचायत अधिकार्‍यांनी गावाला विश्वासात न घेता परस्पर खडी क्रेशरसाठी परवानगी दिली. त्यामुळे होणार्‍या गावाचा नुकसानीला संबंधित ग्रामपंचायत अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी धाऊरच्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, चाचडगाव ते धाऊर रस्ता डांबरीकरण असून दळणवळणाचा हा एकच रस्ता आहे. तो रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांची आहे परंतु सदर ग्रामपंचायत अधिकारी पी. बी. चव्हाण यांनी सदर एनओसीमध्ये सांगितले की, या रस्त्यावर मुरूम टाकून डागडुगीचे काम करण्यात येईल व त्या रस्त्यावरुन १०० ते १५० विद्यार्थी रोज पायी ये -जा करत असतात. या कंट्रक्शनचे वाहने भरधाव वेगाने ये - जा करत असतात. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रदूषण व सांडपाणी यामुळे शेती व्यवसायाला या पाण्यामुळे शेती होत नाही. 

वेळोवेळी तक्रार करूनही यावर काही उपायोजना केल्या जात नाही. सदर नोटीसचा ठरावाला सर्व गावकर्‍यांचा विरोध होता, तरीही त्या क्रेशर चा ठराव ग्रामस्थांना विश्वासात न घेता बोगसरीत्या मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या अजेंडावरती हा विषय नसताना देखील हा सर्व प्रकार करण्यात आला आहे. सदर खडीक्रेशर पासून आम्हाला गावासाठी धोका असल्याने आणि या खडीक्रेशरपासून गावाचा कुठलाही विकास कामाचा आराखडा नसल्याने सदर खडीक्रेशर बंद करण्यात यावा, ग्रामपंचायत अधिकारी सर्वच गोष्टीला जबाबदार आहे ते कुठल्याही ग्रामसभेला उपस्थित नसताना त्यांनी या खडीक्रेशरला परवानगी कशी दिली ? हा मोठा प्रश्‍न पडला आहे. 

तरी ग्रामपंचायत अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. खडीक्रेशर उभारणी करत असताना संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसभेवर ग्रामस्थांना सोबत प्रत्यक्षात चर्चा विनिमय करून ठरावात संमत करण्यात यावा, ग्रामपंचायत अधिकारी पी.बी.चव्हाण यांनी संबंधित व्यक्तीबरोबर संलग्न करून गावाला विश्वासात न घेता ग्रामसभेत ठराव संमत न करता परस्पर परवानगी देऊन गावची दिशाभूल केली आहे. तरी संबंधित ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करून ती परवानगी रद्द करत नव्याने ग्रामसभेवर विषय घेऊन ग्रामसभेत चर्चा विनिमय करून सर्व ग्रामस्थांच्या परवानगी मिळत नाही तोपर्यंत खडीक्रेशर बंद ठेवावे, अन्यथा गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये आम्हाला न्याय मिळे पर्यंत आमच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा धाऊरच्या ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रसंगी वसंत पताडे, राकेश चौधरी, योगेश पताडे, हरीभाऊ पताडे, गणेश पताडे, दिपक पताडे, निवृत्ती पताडे, भास्कर पताडे, अरुण पताडे, बाळू पताडे, आनंदा पताडे, गोटीराम पताडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध