Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ६ मार्च, २०२६

बापाला दिला मुखाग्नी अन लेक निघाली परीक्षेला; शिरपूरच्या नंदिनीची गणितापेक्षाही कठीण 'आयुष्याच्या गणिता'शी झुंज




​शिरपूर प्रतिनिधी:- "दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कर्तव्याची जाणीव कशी ठेवावी," याचे दाहक आणि प्रेरणादायी उदाहरण शिरपूर शहरात पाहायला मिळाले. अवघ्या एक तासापूर्वी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन, डोळ्यांतील आसवे पुसत नंदिनी संदीप कुंवर ही विद्यार्थिनी दहावीच्या गणिताचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर दाखल झाली. वडिलांच्या निधनाचे अतीव दुःख उराशी बाळगून तिने दिलेल्या या परीक्षेने उपस्थितांचे डोळे पाणावले.

शिरपूर तालुक्यातील ​करवंद येथील रहिवासी व शिरपूर येथील पेट्रोल पंपावर कामाला असलेले संदीप शांतीलाल कुंवर (धोबी) यांचे पांढऱ्या कावीळमुळे अकाली निधन झाले. 

कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने कुंवर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. संदीप कुंवर यांची कन्या नंदिनी ही शिरपूर येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाची (हनुमान व्यायाम शाळा) इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे. आज तिचा गणिताचा महत्त्वाचा पेपर होता. मात्र, नियतीने घात केला आणि परीक्षेच्या आदल्याच दिवशी वडिलांची प्राणज्योत मालवली.

​आज सकाळी संदीप कुंवर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या १६ वर्षांच्या नंदिनीने आपल्या वडिलांच्या शरीराला मुखाग्नी दिला. स्मशानभूमीतील वातावरण अत्यंत शोकाकुल असताना, वडिलांचे 'शिक्षण पूर्ण करण्याचे' स्वप्न डोळ्यासमोर ठेवून नंदिनीने धिर धरला. अंत्यविधी आटोपून अवघ्या एका तासात ती परीक्षा केंद्रावर पोहोचली.

​आयुष्याचे गणित पूर्णपणे बिघडलेले असताना, नंदिनीने गणिताचा पेपर सोडवून जी जिद्द दाखवली, तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. संकटाच्या काळातही शिक्षणाप्रती असलेली तिची ही निष्ठा पाहून शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक स्तिमित झाले आहेत. 'बाप' गेल्याच्या दुःखापेक्षाही मोठं यश संपादन करून वडिलांना श्रद्धांजली वाहण्याचा तिचा हा प्रयत्न समाजासाठी आदर्श ठरला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध