Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ मार्च, २०२६

पिंपरीत वीज यंत्रणेचा बोजवारा; शेतकऱ्यांचे नुकसान, जीवितालाही धोका!



शिरपुर प्रतिनिधी: पिंपरी येथील शेतकरी बांधवांच्या शेतातील रोहीत्रांची दुरावस्था झाली आहे. लोंबकळणार्‍या तारा, जळालेल्या केबल, वाकडे तिरके विद्युत पोल, गळणारे ऑईल आणि जळालेल्या पावर डिस्ट्रीब्यूशन बोर्डच्या पेट्या शेतकऱ्यांच्या जीवितास धोका ठरत आहेत. तर ऊस, गहु हरभरा अशा पिकांना आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी शेतकरी श्री. वासुदेव जयसिंग गिरासे यांच्या शेतातील रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) व पावर डिस्ट्रीब्यूशन यंत्रणेची अत्यंत भीषण व धोकादायक अवस्था समोर आली असून, संबंधित वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहेत. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान पावर डिस्ट्रीब्यूशन बॉक्स पूर्णपणे उघड्या अवस्थेत असून, आतमधील वायरिंग जळालेल्या व तुटलेल्या स्थितीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ट्रान्सफॉर्मरवरील कनेक्शन सैल व असुरक्षित असल्याने उघड्यावर लोंबकळणाऱ्या तारांमुळे कधीही शॉर्टसर्किट होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर बिघाडामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी वारंवार जळत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय वेळेवर पिकांना पाणी उपलब्ध होत नसल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे मोटार दुरुस्ती व नवीन उपकरणांवर खर्च वाढत असताना, दुसरीकडे पीक उत्पादनात घट होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

इतकेच नव्हे तर या उघड्या व धोकादायक वायरिंगमुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी, मजूर तसेच जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. सैल व जळालेल्या तारांमुळे शेतात आग लागण्याचीही भीती व्यक्त होत असून, त्यामुळे संपूर्ण पीक भस्मसात होण्याचा धोका नाकारता येत नाही. स्थानिक शेतकऱ्यांकडून वारंवार तक्रारी करूनही संबंधित वीज वितरण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे “एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. महावितरणसारख्या जबाबदार यंत्रणेकडून होत असलेला हा हलगर्जीपणा अत्यंत गंभीर असून, हा प्रकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन वाढीव क्षमतेचे नवीन रोहीत्र बसवावे, पावर डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व संपूर्ण वायरिंगची दुरुस्ती करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

जर या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही, तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत आवश्यक झाले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध