Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ मार्च, २०२६

अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू


अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी रात्री सुमारे सव्वा नऊ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मृत तरुणाचे नाव अरुण सुरेश महाजन (वय अंदाजे ३०-३५ वर्षे) असे असून, त्यांना गोळी लागल्याने गंभीर दुखापत झाली होती. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.


प्राथमिक माहितीनुसार, ही घटना गावठी कट्टा हाताळताना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि, घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी अपघाती मृत्यू, आत्महत्या किंवा इतर कोणताही प्रकार असण्याची शक्यता नाकारलेली नसून सर्व अंगांनी तपास सुरू ठेवला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू आहे.


दरम्यान, या घटनेमुळे शाह आलम नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचा नेमका उलगडा होईल, असे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध