Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ मार्च, २०२६

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटीलच्या शिक्षणाची जबाबदारी जैन इरिगेशनकडे जीवरक्षक ओमचे शिक्षणाचे स्वप्न होणार पूर्ण; धाडसाला मिळणार मानाचा मुजरा



गणपूर प्रतिनिधी:- अनेर नदीत बुडणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांना जीवदान देत आपल्या अद्भुत धाडसाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय १४) आता शिक्षणाच्या बाबतीतही नशीबवान ठरला आहे. जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने ओमच्या पुढील संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याचा मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील गणपूर येथे अनेर नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या चार मुलांना पोहता येत नसल्याने ते अचानक बुडू लागले. परिस्थिती गंभीर असतानाच तेथून जात असलेल्या ओम पाटीलने क्षणाचाही विलंब न करता नदीतील खोल डोहात उडी घेतली. विशेष म्हणजे, स्वतःला व्यवस्थित पोहता येत नसतानाही ओमने जीवाची पर्वा न करता एकामागोमाग एक चारही मुलांना बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले. या धाडसी कृत्यामुळे ओम हा त्या मुलांसाठी अक्षरशः 
"देवदूत" ठरला ओम सध्या गावातील शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. त्याचे वडील रवींद्र पाटील व आई सारलाबाई हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असताना ओमसारख्या गुणी व धाडसी मुलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कुटुंबात मोठा भाऊही शिक्षण घेत असल्याने आर्थिक ताण अधिकच वाढला होता दरम्यान,ओमच्या 
शौर्याची बातमी माध्यमांत झळकताच जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी तात्काळ याची दखल घेतली. समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू न देण्याच्या जैन परिवाराच्या परंपरेनुसार ओमच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत बोलताना अशोक 
जैन म्हणाले, “संपत्तीपेक्षा माणुसकी व मनाचे मोठेपण अधिक महत्त्वाचे आहे. भवरलालजी जैन यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आम्ही समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. ओमसारख्या धाडसी मुलाचे शिक्षण थांबू नये , हीच आमची भावना आहे.”

ओमच्या या अतुलनीय धाडसाबद्दल अशोक जैन यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कारही करण्यात आला आहे. एका बाजूला जीव वाचवणारे शौर्य, तर दुसऱ्या बाजूला शिक्षणाची नवी दिशा—ओम पाटीलची ही प्रेरणादायी कहाणी आता अनेकांसाठी आदर्श ठरणार आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध