Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ मार्च, २०२६
शिरपूरच्या पाड्यांवर 'किराणा' नव्हे, 'विष' पोहोचतेय; दुचाकीस्वार सेल्समन बनले गुटखा तस्कर!
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागातील खेड्यापाड्यांची गरज ओळखून सुरू झालेले साखळी नेटवर्क आता गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले आहे. खेड्यापाड्यांवरील छोट्या दुकानदारांना किराणा, कपडे आणि प्लास्टिक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या नावाखाली फिरणारे दुचाकीस्वार व्यावसायिक आता छुप्या पद्धतीने 'गुटखा तस्कर' बनले असून, प्रशासनाच्या नाकाखाली हे विषारी नेटवर्क जोमाने फोफावत आहे.
तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत काही मोठ्या व्यापाऱ्यांनी दुर्गम पाड्यांपर्यंत माल पोहोचवण्यासाठी दुचाकीस्वारांचे एक जाळे विणले आहे. हे तरुण शहरातून घाऊक दरात किराणा माल घेऊन तो पाड्यांवरील दुकानांपर्यंत पोहोचवतात आणि त्यातून आपला नफा कमावतात. सुरुवातीला हा व्यवसाय रोजगाराचे साधन म्हणून पाहिला जात होता. मात्र, अल्पावधीत जास्त पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी यातील बहुतांश फिरते विक्रेते आता प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या तस्करीकडे वळले आहेत.
किराणा सामानाने भरलेल्या गोण्यांच्या आड गुटख्याची मोठी पाकिटे लपवून ही मंडळी बिनबोभाटपणे पाड्यापाड्यांवर पोहोचत आहेत. विशेष म्हणजे, दुर्गम भागात पोलिसांची गस्त कमी असते आणि वनविभागाच्या रस्त्यांचा वापर करून हे तस्कर मुख्य रस्त्यांवरील तपासणी नाके सहज टाळतात. खेड्यापाड्यांवरील तरुण पिढीला व्यसनाच्या खाईत ढकलण्याचे काम या 'दुचाकीस्वार सेल्समन'च्या माध्यमातून पद्धतशीरपणे सुरू आहे.
केवळ किरकोळ विक्रेतेच नाही, तर त्यांना हा साठा पुरवणारे शहरातील 'बडे मासे' देखील या साखळीचा मुख्य कणा आहेत. किराणा मालाच्या नावाखाली चालणारा हा अवैध धंदा शिरपूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभाग या गुटखा तस्करांच्या मुसक्या कधी आवळणार, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. हे विषारी जाळे वेळीच नष्ट केले नाही, तर दुर्गम भागातील पिढी व्यसनाधीनतेच्या उंबरठ्यावर उभी ठाकेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया
""दुर्गम भागात छुप्या पद्धतीने अमली पदार्थ किंवा अवैध वस्तूंची विक्री व वाहतूक होत असल्याबाबत पोलीस स्टेशनला अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र, अशा प्रकारचे कृत्य कायद्याने गुन्हा आहे. जर कोणालाही यासंदर्भात काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल आणि प्राप्त माहितीच्या आधारे संबंधित गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील."— जयपाल हिरे पोलीस निरीक्षक, शिरपूर तालुका पोलीस स्टेशन.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा