Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

धक्कादायक व्हिडिओ प्रकरण : जांबुटके ग्रामपंचायतीतील कबुलीजबाबानंतर संपूर्ण चौकशीची मागणी फक्त निलंबन पुरेसे नाही; संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईची दिंडोरीकरांची ठाम भूमिका




गोरख जाधव :-
दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र चौधरी यांनी “मी एकट्याने पैसे खाल्ले नाहीत, तर गटविकास अधिकारीपासून ते जिल्हा परिषद अधिकाऱ्यांपर्यंत पैशांचे वाटप झाले” असा धक्कादायक दावा केल्याचे समोर आले आहे.
या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी संबंधित ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र चौधरी यांना निलंबित करण्याची कारवाई केली. मात्र, केवळ निलंबनावरच कारवाई थांबवणे योग्य नसून, व्हिडिओमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या इतर सात ते आठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.
ग्रामपंचायत अधिकारी चौधरी यांनी ज्या अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत, त्या प्रत्येकावर आरोपांची शहानिशा करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकशी समिती गठित करून संपूर्ण प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने करावा, अशीही मागणी करण्यात येत आहे.
सध्या दिंडोरी तालुक्यात लाचखोरी आणि कमिशनच्या चर्चेमुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. ही बदनामी थांबवण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे दिंडोरीकरांचे मत आहे.
त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सर्व संबंधितांवर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी दिंडोरी तालुक्यातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध